देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत आता सरकार चाचण्यांची संख्याही वाढवण्यावर भर देत आहे. दरम्यान, गुरूवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोबाईल लॅब लाँच केली. या मोबाईल लॅबचा वापर करोनाच्या चाचण्या करण्यासाठी करण्यात येणार आहे. ही मोबाईल लॅब कोणत्याही ठिकाणी जाऊन करोनाची चाचणी करू शकणार आहे. सर्वत्र जाऊन करोनाची चाचणी करणारी ही देशातील पहिली मोबाईल लॅब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोबाईल लॅबमध्ये करोना व्हायरसच्या २५ चाचण्या RT-PCR तंत्रज्ञानाद्वारे, ३०० चाचण्या ELISA तंत्रज्ञानाद्वारे करता येणार आहेत. तर या व्यतिरिक्त टिबी आणि एचआयव्हीशी निगडीतही चाचण्या मोबाइल व्हॅनमध्ये करता येणार आहे. ही मोबाईल व्हॅन अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी लॅबची सुविधा नाही अशा ठिकाणी या लॅबचा वापर केला जाईल. याचाच अर्थ गाव-खेड्यांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.

“देशात फेब्रुवारी महिन्यामध्ये एकच लॅब होती. परंतु आज आमच्याकडे ९५३ लॅब आहेत. यापैकी सुमारे ७०० लॅब शासकीय आहेतय म्हणून आता देशात कोरोना व्हायसची अधिक चाचणी केली जाईल,” अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. तसंच दुर्गम भागांमध्ये रुग्णांच्या चाचणीसाठी या लॅबचा वापर केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या देशभरात करोनाच्या ६३ लाख चाचण्या करण्यात आल्या. आयसीएमआरनं जूनच्या अखेरपर्यंत दररोज तीन लाख चाचण्या करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला होता.