जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव एकीकडे देशात झपाट्याने वाढत असताना, एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतामधील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी देशात ८१ हजार ५३३ जण करोनामुक्त झाले आहेत. करोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं देशातील प्रमाण (रिकव्हीर रेट) ७७.७७ टक्क्यांवर पोहचला आहे. तर, शनिवारपर्यंत देशभरात एकूण ३७ लाख दोन हजार ५९६ जण करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण वाढत असले तरी एक गंभिर समस्या समोर आली आहे. करोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना आरोग्याच्या समस्या दिसत आहेत. अशक्तपणा किंवा शरिराचा एखादा भाग खराब होणं यासारख्या समस्या करोनामुक्त होणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये दिसत आहेत.

या समस्यांना समोर ठेवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं करोनामुक्त झालेल्यांसाठी काही सुचना आणि उपाय (पोस्ट कोविड-19 केयर प्रोटोकॉल) सुचवले आहेत. करोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची कशी काळजी घ्यावी, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार, करोनामुक्त झालेल्यांनी नियमित मॉर्निंग वॉकला किंवा सायंकाळी चालायला जावं. तसेच दररोज योग अभ्यासही करावा. तसेच करोनामुक्त झालेल्यांनी नियमित चवनप्राश, हळदीचे दुध, गिलोय पाउडर, अश्वगंधासारख्या रोगप्रतिराकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करावा. याशिवाय दररोज सकाळी कोमट पाण्यानं गुळणी भरावी आणि गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्याशिवाय, सहज पचेल अशा संतुलित अन्नाचं सेवन करावं

स्वास्थ्य मंत्रालयाच्या सुचनेमध्ये करोनामुक्त झालेल्यांना आयुष औषधं घेण्यासही सांगितली आहेत. ही औषधं फक्त रजिस्टर्ड डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळतील. ज्यांचा घसा खरखर करतो त्यांनी नियमित कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्यात. करोनामुक्त झालेल्यांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या नियमांचं पालन करावं. याशिवाय नियमित कोमट पाण्याचं सेवन करावं. तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचं नियमित सेवन करावं.