केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. अमित शाह यांनी बोलावलेल्या या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत अद्यापही करोना स्थिती नियंत्रणात आलेली नाही. यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे. राजधानी दिल्लीमधील करोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी अमित शाह आणि अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक बैठका घेतल्या आहेत.

बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजलदेखील उपस्थित राहणार आहेत. दिल्लीमधील करोनाबाधित रुग्णसंख्या १२ दिवसांपासून वाढत चालल्याचं दिसत आहे. रुग्णसंख्या कमी होत असतानाच ३ नोव्हेंबरला दिल्लीत एका दिवसात सर्वाधित ६७३५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

भारतातील करोनाबाधितांचा ८८ लाखांचा टप्पा पार
दरम्यान देशात गेल्या चोवीस तासात ४१ हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांच्या संख्येने ८८ लाखांचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या ८८,१४,५७९ वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांत देशात एकूण ४४७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत देशभरात १,२९,६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या ४,७९,२१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ८२,०५,६०७ रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत.

करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या महाराष्ट्रात सध्या ८५,०४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर १६,०९,६०७ रुग्ण बरे झाले असून ४५,८०९ मृत्यू झाला आहे. त्यानंतर कर्नाटकमध्ये सध्या २८,०४५ अॅक्टिव्ह रुग्ण असून ८,१८,३९२ रुग्ण बरे झाले असून ११,४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.