पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी व तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटलेला आहे. याच दरम्यान आता भाजपा नेता व मंत्र्यांचे दौरे देखील सुरू आहेत. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील काल रात्री कोलकाता येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. तृणमूल काँग्रेसचे दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपाच्या वाटेवर जात असल्याने, पक्षाची ही गळती थांबवणे हे टीएमसी प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समोर आता मोठे आव्हान निर्माण झाल्याचे दिसत आहे.

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, तृणमूलचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सुरू झालेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर आता अमित शाह यांच्या उपस्थितीत आणखी काही टीएमसी नेते व अन्य पक्षांचे नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे पोहचल्याची ट्विटद्वारे माहिती दिली. ”मी कोलकाता येथे पोहचलो आहे. मी गुरदेव टागोर, ईश्वरचंद विद्यासागर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पवित्र भूमीस नमन करतो.” असं शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

ममतांसमोर गळती रोखण्याचं मोठं आव्हान; आणखी एका नेत्याने सोडली तृणमूल काँग्रेस

यावेळी त्यांचे कोलकाता विमानतळावर अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले, मोठ्या संख्येने भाजपा नेते व कार्यकर्ते तिथे जमलेले होते. तृणमूलचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांनी गुरुवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या समर्थनार्थ पंडाबेश्वरचे आमदार आणि असनसोल पालिकेतील पक्षनेते जितेंद्र तिवाही यांनीही तृणमूलचा राजीनामा दिला आहे. तसेच, पश्चिम बंगालमधील बारखपूरचे तृणमूल काँग्रेसचे आमदार शीलभद्र दत्ता यांनी शुक्रवारी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला.