जम्मू-काश्मीर पोलिसांना लवकरच बुलेटप्रूफ वाहने मिळणार आहेत. केंद्र सरकारने वाहनांच्या खरेदीसाठी निधी दिला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. बुलेटप्रूफ वाहने खरेदी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीरमधील पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. आपल्या जवानांना बुलेटप्रूफ जॅकेट आणि त्यासाठी निधी देण्यात आला आहे, अशी माहिती सिंह यांनी दिली. अनंतनागमध्ये सीआरपीएफ जवान आणि पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अनंतनाग जिल्ह्यात १६ जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्यात वरिष्ठ अधिकारी फिरोज अहमद यांचाही समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनाही बुलेटप्रूफ वाहने देण्यात येतील, अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. यावेळी राजनाथ सिंह यांनी अनंतनागमध्ये ऑगस्टमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी अब्दुल रशीद यांना श्रद्धांजली वाहिली. रशीद यांच्या अंत्यसंस्कारावेळी आक्रोश करणाऱ्या त्यांच्या मुलीचे छायाचित्र पाहून मला तीव्र दुःख झाले होते, असेही सिंह म्हणाले. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांचा सरकारला सार्थ अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

काश्मीरसाठी बलिदान देणारे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान वाटतो. प्रतिकूल परिस्थितीत काम करणे खूपच आव्हानात्मक आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांच्या कौतुकासाठी शब्दही अपुरे पडतात, असेही सिंह म्हणाले. दरम्यान, काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तींशी आपण खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहोत, असे सिंह यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सांगितले होते.