बेलगाम आणि वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भाजप नेत्यांच्या मांदियाळीत आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भर पडली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल हे सर्वजण देशासाठी फासावर गेले, अशी मुक्ताफळे उधळून प्रकाश जावडेकर यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. साहजिकच जावडेकरांच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवली आहे.
मध्य प्रदेशातील छिंदवाडामध्ये तिरंगा यात्रेसाठी जावडेकर उपस्थित होते. यावेळी भाषणाच्या ओघात जावडेकर म्हणाले की, ब्रिटिशांना हाकलून ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्वांना आम्ही सलाम करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडीत नेहरु, भगतसिंह, राजगुरु हे सर्व फासावर गेले. क्रांतीवीर सावरकरांसह अन्य महान स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी अनेक लाठ्या खाल्या, गोळ्या झेलल्या. अनेक जण कारागृहामध्ये गेले, फासावर लटकले, असे जावडेकर यांनी म्हटले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे पंतप्रधानपद तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्रिपद भूषविले होते. मात्र, जावडेकर यांनी भाषणात नेहरु व सरदार पटेल यांचा शहीद असा उल्लेख केला. शिवाय, नेहरु, पटेल हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर लटकल्याचे म्हटले आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबत अद्यापही खुलासा झालेला नसतानाही जावडेकर यांनी त्यांना शहिद संबोधले आहे. जावडेकर यांच्यासारख्या मंत्रिपदावरील व्यक्तीच्या या गंभीर अज्ञानामुळे भाजपला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागणार आहे.