28 February 2021

News Flash

केंद्रीय मंत्री हेगडेंना जीवे मारण्याची धमकी, ५ दिवसांपूर्वीच अपघातातून बचावले होते

आपल्याला जीवे मारण्यासाठीच अपघात केल्याचा आरोप हेगडेंनी केला होता. टिपू सुलतान जयंती, भारतीय संविधान आणि साहित्यिकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.

अनंत कुमार हेगडे

केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकमधील भाजपाचे दिग्गज नेते अनंतकुमार हेगडे यांना एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हेगडे यांनी याप्रकरणी सिरसी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम ५०४ आणि ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पाच दिवसांपूर्वीच (दि.१८ एप्रिल) अनंतकुमार हेगडे यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली होती. या अपघातात हेगडे थोडक्यात बचावले होते. आपल्याला जाणूनबुजून मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी अपघातानंतर केला होता. त्यांच्या वाहन ताफ्याबरोबर असलेल्या लोकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या हेगडे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने कर्नाटकच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ट्रक चालकाने जाणूनबुजून कारला धडक दिल्याचा आरोप हेगडे यांनी केला होता. कारचा वेग जास्त असल्यामुळे ती वेगाने पुढे गेली आणि ट्रकची धडक ताफ्यातील दुसऱ्या कारला बसली. या अपघातात आपले कर्मचारी गंभीर जखमी झाल्याचे हेगडे यांनी सांगितले होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांमुळे कर्नाटकात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्ष मोठ्या जोमाने प्रचारात उतरले आहेत. हेगडेही सध्या प्रचारात व्यस्त आहेत. मागील वर्षी मोदी सरकारमध्ये त्यांना स्थान देण्यात आले होते. हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत. राजकारणाबरोबरच ते कोरियाई मार्शल आर्ट तायक्वांदोमध्ये निपुण आहेत. टिपू सुलतान जयंती, भारतीय संविधान आणि साहित्यिकांबाबतच्या त्यांच्या वक्तव्यामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 11:41 am

Web Title: union minister anant kumar hegde allegedly received a threat
Next Stories
1 उत्तर कोरियात भीषण बस अपघात, ३० चिनी पर्यटकांचा मृत्यू
2 जेसिका लालच्या मारेकऱ्याला माफी; बहिणीचे कारागृह प्रशासनाला पत्र
3 काँग्रेसला धक्का, उपराष्ट्रपतींनी फेटाळला सरन्यायाधीशांविरोधातील महाभियोग प्रस्ताव
Just Now!
X