संविधान बदलण्याच्या वक्तव्याप्रकरणी माफी मागणारे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी गल्लीतले कुत्रे म्हणत नवा वाद निर्माण केला आहे. कर्नाटकातील बेल्लारी येथे शनिवारी एका रोजगार मेळाव्यासाठी गेल्यानंतर काही दलित संघटनांनाच्या कार्यकर्त्यांनी हेगडे यांचे वाहन अडवले आणि त्यांच्याविरोधात घोषणा देत काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. संविधानाविषयी हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.

सरकारी लाभासाठी असते साहित्यिकांचे लिखाण, केंद्रीय मंत्री हेगडेंचे वादग्रस्त वक्तव्य

रोजगार मेळाव्यानंतर हेगडे म्हणाले, आम्ही तुमची मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. काहीही होवो आम्ही तुमच्याबरोबर राहू. आम्ही आपल्या लोकांच्या रक्षणासाठी काहीही करू. आम्ही विरोध करणाऱ्या गल्लीतील काही कुत्र्यांना फसणार नाहीत. पण हाच मुद्दा पकडत काँग्रेसने भाजपावर हल्ला केला. अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर भाजपाने आपले धोरण स्पष्ट केले पाहिजे आणि त्याचा आपल्या घोषणापत्रात समावेश केला पाहिजे, असे म्हटले. ‘एनडीटीव्ही’बरोबर बोलताना काँग्रेस नेते टॉम वडक्कन म्हणाले की, हीच एक बाब आहे की, याच्याविरोधात दलित अनेक वर्षे लढत आहेत. या व्यक्तीला कॅबिनेटमध्ये राहण्याचा कोणताच हक्क नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, हेगडे यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे म्हटले. आपली प्रतिमा खराब करण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जे माझ्या वर्तणुकीवर टीका करत होते, त्यांच्यासाठी माझे हे वक्तव्य होते. भाजपाचे विरोधक आणि दााक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीही हेगडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आता बास, खूप झाले. वारंवार लोकांना वेदना पोहोचवणारे अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यांनी दलितांना कुत्रा म्हटले आहे. ते तर उलट त्यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करत होते. भाजपाच्या सुप्रीम नेत्यांनो आता तुम्ही यांना राजीनामा देण्यास सांगणार नका. की, तुम्ही त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करता, असा सवालच त्यांनी विचारला आहे.

 

दरम्यान, मागील आठवड्यात त्यांनी साहित्यिकांवर टीका केली होती. बुद्धिजीवी आणि साहित्यिक हे केवळ सरकारी लाभ मिळवण्यासाठी आपले काम आणि कलांचे प्रदर्शन करतात, असे वक्तव्य करून कर्नाटकमध्ये खळबळ उडवून दिली होती. साहित्यिक जे काही लिहितात ते साहित्य बनते. त्यांच्या लेखनाला कोणतीही प्रासंगिकता किंवा अर्थ नसतो. फक्त सरकारी जमीन घेण्यासाठी ते असे करतात. हे तथाकथित बुद्धिजीवी मला मनुष्य होण्यास सांगतात. मी काय जनावर आहे का ? मनुष्य जन्मानंतर आपले पुढील लक्ष्य हे देवतांसारखे होण्याचा असला पाहिजे. या सर्वांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांनी अशी टिप्पणी करणे बंद केले पाहिजे, असे हेगडे म्हणाले होते.