नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते हिंसाचाराला चिथावणी देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतत मौन पाळले असल्याने जामिया आणि शाहीन बाग येथे गोळीबाराच्या घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचे माकपने सोमवारी म्हटले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान द्वेषमूलक वक्तव्ये केल्याबद्दल भाजपचे खासदार परवेश वर्मा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. पंतप्रधानांनी मौन पाळल्यानेच गोळीबाराच्या घटनांची पुनरावृत्ती होत आहे, शांततेने निदर्शने करणाऱ्यांना धाक दाखविला जात आहे तर जे हिंसाचाराला चिथावणी देत आहेत त्यांना मोकळे सोडण्यात आले आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी ट्वीट केले आहे.

जेव्हा मंत्रीच हिंसाचाराला प्रोत्साहन देतात तेव्हा कोणीच सुरक्षित राहत नाही, प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, शांततापूर्ण निदर्शने करणे हा  प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

माजी पोलिस अधिकाऱ्याची अलिगडमधून परतपाठवणी

अलिगड : नागरिकत्व कायद्याविरोधात अलिगड विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना संबोधित करण्यासाठी आलेले माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांना पोलिसांनी येथे ताब्यात घेतले व दिल्लीस परत जाण्याचा आदेश दिला. रेहमान यांनी गेल्या डिसेंबरमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात पदाचा राजीनामा दिला होता.