News Flash

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती.

संग्रहीत

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन पासवान यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून आपले वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना प्रकट केली आहे.

बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे कदाचित देशातील एकमेव नेते असतील.

राजकारणाची नस पकडलेले रामविलास पासवान पहिल्यांदा १९६९मध्ये आरक्षित मतदारसंघातून संयुक्त सोशलिस्ट पार्टीकडून बिहारच्या विधानसभेत पोहोचले होते. १९७४मध्ये राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे खंदे अनुयायी म्हणून ते लोकदलाचे सरचिटणीस बनले. राज नारायण, कर्पूरी ठाकूर आणि सत्येंद्र नारायण सिन्हा सारख्या आणीबाणीतील प्रमुख नेत्यांचे ते जवळचे सहकारी होते.

सन १९४६ मध्ये बिहारच्या खगडिया येथे जन्मलेल्या रामविलास पासवान यांनी एका छोट्या भागातून येऊन दिल्लीच्या सत्तेपर्यंतचा संघर्ष आपल्या एकट्याच्या जीवावर केला होता. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सुमारे पाच दशकांपर्यंत त्यांची बिहार आणि देशाच्या राजकारणात छाप राहिली. दरम्यान, दोन वेळेस लोकसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 8:55 pm

Web Title: union minister and ljp leader ram vilas paswan passes away aau 85
Next Stories
1 “ट्रम्प हे खरे ‘जुमलेबाज’ आहेत, तुम्हाला ठाऊकच असेल कोणासारखे”
2 ‘पंतप्रधान मोदींनी स्वत:साठी ८,४०० कोटीचे विमान विकत घेतले, इतक्या पैशात तर…’
3 फोर्ब्सची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर; मुकेश अंबानी सलग १३व्या वर्षी अव्वलस्थानी
Just Now!
X