केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉग लिहून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अखेर एका बुडणाऱ्या राजवंशाला वाचवण्यासाठी किती खोटं बोलावं लागेल?, अशा शब्दांत त्यांनी गांधी कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे. जगभरातील लोकशाहीत जे लोक खोटेपणाचा आधार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतत: ते स्वत: सामाजिक जीवनातून गायब होऊन जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, आधुनिक जगात जितके राजकीय वंशज आहेत. त्यांच्या काही मर्यादा आहेत. महत्वकांक्षी समाज आता अशा पद्धतीची व्यवस्था पसंत करत नाही. आज लोकांना उत्तर हवे आहे. कामगिरीवर ते भरवसा ठेवतात.

काँग्रेसवर तिखट शब्दांत टीका करताना ते म्हणाले की, सर्वांत वाईट गोष्ट ही आहे की, भारत सर्वांत जुन्या पक्षाच्या एका घराण्याच्या जाळ्यात अडकला आहे. त्यांच्या नेत्यांमध्ये इतकीही हिंमत नाही की ते या घराण्याला चांगले-वाईटबाबत बोलू शकत नाहीत. नेत्यांना नोकराच्या मानसिकतेमुळे फक्त एकाच परिवाराचे गुण गायचे हेच माहीत आहे.

एका बुडणाऱ्या वंशाला वाचवण्यासाठी अखेर किती खोटं बोलावं लागेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राफेल व्यवहारात जनतेचे हजारो कोटी रूपये वाचले आहेत. पण त्याला बदनाम करण्यासाठी रोज खोटं बोललं जात आहे.

खोटेपणाचे सर्वांत ताजे उदाहरण म्हणजे राफेलसंबंधी संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅग अहवालाबाबत आहे. विद्यमान कॅग २०१४-१५ मध्ये आर्थिक प्रकरणांचे सचिव होते. त्यावेळी सर्वांत वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्यांना वित्त सचिव करण्यात आले होते. राफेल संबंधीची कोणतीही फाईल त्यावेळी त्यांच्याकडे गेली नव्हती. काही घराणेशाहीतील लोक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कॅगवर हल्लाबोल करत सर्वोच्च न्यायालयावरही टिप्पणी केली होती. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालावरून संपूर्ण प्रक्रियेलाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे त्यांनी राहुल गांधींचे नाव न घेता म्हटले.