पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध जादवपूर विद्यापीठात डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनेच्या एका गटाकडून पर्यावरण राज्य मंत्री व खासदार बाबुल सुप्रियो यांना घेराव घालत धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर विद्यापीठ परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन, मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो विद्यापीठात गेले होते. या ठिकाणी सुप्रियो हे दाखल होताच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि आर्ट फॅकल्टी स्टुडंट्स युनियनच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी ‘बाबुल सुप्रियो गो बॅक’ अशा घोषणाही देण्यात आल्या. दीड तास त्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले. दरम्यान एका आक्रमक झालेल्या विद्यार्थी गटाने सुप्रियो यांना घेरून धक्काबुकीही केली. यामध्ये त्यांचा चष्मा देखील तुटल्याचे समोर आले आहे. शिवाय त्यांच्यादिशेने बॉटल फेकण्यात आली होती. एवढेच नाहीतर सायंकाळी ते विद्यापीठ परिसरातून निघताना देखील त्यांना विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

या प्रकाराची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या राज्यपाल जगदीप धनकड यांना देखील या विद्यार्थ्यांच्या विरोधास सामोरे जावे लागले. विद्यापीठात दाखल झाले मात्र त्यांनाही विद्यार्थ्यांनी घेराव घातला. अखेर कसेबसे राज्यपाल धनकड यांनी सुप्रियो यांना आपल्या वाहनाद्वारे घटनास्थळावरून बाहेर काढले. यावेळी देखील विद्यार्थ्यांकडून घोषणबाजी सुरूच होती.

माझे केस ओढण्यात आले, मला धक्काबुक्की करण्यात आली –
यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रयो यांनी सांगितले की, मी या ठिकाणी राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. मात्र विद्यापीठामधील काही विद्यार्थ्यांच्या गैरवर्तवणुकीचे वाईट वाटत आहे. त्यांनी मला घेरले, माझे केस ओढले व मला धक्का दिला. मात्र त्यांनी काही जरी केले तरी ते मला उचकवू शकणार नाहीत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधकाची भूमिका सत्ताधारी पक्षाप्रमाणेच महत्वाची आहे. मतभेदांना धैर्याने सामोरे जाणे गरजेचे आहे. अशाप्रकारे वागणे निषेधार्ह आहे.