सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोध पक्षांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी आपली भूमिका मांडावी याची मागणी करत विरोधी पक्षांकडून संसदेत घोषणाबाजी व गोंधळ घातला जात आहे. अद्यापही पंतप्रधान मोदी यांनी संसदेत यासंबंधी भाष्य केलेले नाही. त्यामुळे संसदेचे कामकाज ठप्पच झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या संसदेतील गैरहजेरीबाबत केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी मात्र विरोधी पक्षांना उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट वडलांचीच उपमा देत, जब छोटे बच्चे ही इनका जवाब दे सकते है तो ‘डॅडी’ को आने की क्या जरूरत है, अशा शब्दांत विरोधी पक्षाची खिल्ली उडवली.
संसदेबाहेर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सुप्रियोंनी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मंत्रिमंडळातील इतर मंत्री नोटाबंदीवर सरकारची भूमिका मांडत आहेत. यावर पंतप्रधानांनी वेगळे उत्तर देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूंनीही विरोधकांवर खरमरीत शब्दात टीका केली. पंतप्रधानांवर टीका करणे सध्या फॅशन बनली आहे. पंतप्रधानांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे त्यांनी म्हटले.
विरोधक गोंधळ घालत असल्याने संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. विरोधक संसदेचे कामकाज का चालू देत नाहीत, चर्चेपासून ते का पळताहेत, असा सवाल नायडूंनी या वेळी व्यक्त केला. याचे स्पष्टीकरण विरोधकांनी द्यायलाच हवे, असेही त्यांनी या वेळी म्हटले.

भाजपचे खासदार परेश रावल यांनीही विरोधकांवर टीका केली. ज्यांचे पैसे ‘वेल’मध्ये (विहिरीत/पाण्यात) गेले आहेत, तेच लोक सध्या संसदेच्या ‘वेल’मध्ये गोंधळ घालत आहेत, अशी उपरोधिक टीका खासदार रावल यांनी केली. मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळे रोख रकमेच्या स्वरूपात काळे धन बाळगणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. हा काळा पैसा बँकेत जमा करायचा तर सरकारकडून कारवाई होण्याची भीती आणि नाही केला तर पैसा वाया जाण्याची भीती, असे दुहेरी संकट या काळा पैसाधारकांपुढे उभे राहिल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस खासदार सीताराम येचुरी यांनी संसदेत कामकाज न होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले. मोदींच्या उद्दामपणामुळेच संसदेचे कामकाज ठप्प होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने पंतप्रधान मोदींना नोटाबंदीबाबत संसदेत बोलण्याची मागणी करत आहे. मात्र मोदी हे संसदेबाहेर बोलण्याला प्राधान्य देत असून हा संसदेचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले.