हैदराबाद विद्यापीठातील एका दलित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंडारू यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून हैदराबाद विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेणाऱया पाच विद्यार्थ्यांच्या निलंबनासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या पाच विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्या केलेल्या रोहित वेलूम या विद्यार्थ्याचा समावेश होता.
रोहित वेलूम या विद्यार्थ्याने रविवारी विद्यापीठाच्या वसतीगृहामध्ये त्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित वेलूम हा आंबेडकर विद्यार्थी संघटनेशी संबधित होता. विद्यापीठाने निलंबित केल्याप्रकरणी या पाच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थी संघटनांनी उपोषण करत निषेध व्यक्त केला होता. आता रोहितच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण आणखी तापले असून, विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आज बंद पुकारला आहे.
दरम्यान, रोहितचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढविण्यात आला आहे.