उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील बाबा राघव दास रुग्णालयात तीन दिवसांमध्ये ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही घटना घडल्याची चर्चा असताना यामागे षडयंत्र असल्याची शक्यता केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. ‘या घटनेमागे एखादे कटकारस्थान असू शकते,’ असे विधान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कुलस्ते यांनी हा संशय व्यक्त केला आहे.

‘बाबा राघव दास रुग्णालयात ९ ऑगस्टपूर्वी झालेले मृत्यू आणि ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान झालेले मृत्यू यांच्या आकड्यांमधील फरक लक्षात घेतल्यास कोणत्या तरी दबावामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते,’ असा अजब तर्क कुलस्ते यांनी दिला आहे. मात्र या प्रकरणात नेमका कोणता दबाव होता, हे कुलस्ते यांनी स्पष्ट केलेले नाही. ऑक्सिजन अभावी बाबा राघव दास रुग्णालयातील मुले दगावल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र चौकशी अहवाल येण्यापूर्वीच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांनी यामागे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

गोरखपूरमधील बाबा राघव दास रुग्णालयात मागील ६ दिवसांमध्ये ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. आज (रविवारी) योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डादेखील त्यांच्या सोबत होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला नसल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले. यासोबतच बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले.