कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, हेगडे यांच्यावर भादंवि १५३ आणि ५०४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेगडे यांनी भाजपच्या परिवर्तन रॅलीदरम्यान, सिद्धरामय्या यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केले होते.


या रॅलीमध्ये अनंतकुमार यांनी म्हटले होते की, ‘सिद्दारामय्या यांना केवळ आपल्या व्होट बँकेचीच चिंता सतावत असते. मतांसाठी तर ते इतरांच्या चपलाही चाटू शकतात.’ भाजप नेत्याच्या अशा अपमानजनक वक्तव्यानंतर काँग्रेसने ही बाब गंभीरतेने घेतली त्यानंतर म्हैसूरच्या कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली.

कोर्टाने या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने हेगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव येथे त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता हे प्रकरण बेळगांव पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. हेगडे यांच्यावर चिथावणीखोर आणि अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपनेते सतत अशा प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन राजकीय तसेच वैचारिक विरोधकांवर टीका करीत आहेत. मात्र, नंतर त्यांनाच उलटे टीकेचे धनी व्हावे लागत आहे. सोशल मीडियातूनही भाजप नेते हेगडे यांच्या या वक्तव्यावरून बरीच चर्चा झाली होती.