मी एक सामान्य व्यक्ती, छोटा कार्यकर्ता आहे. मला देशासाठी जे काही करता येईल ते अत्यंत प्रामाणिकपणे मी करतो. मी आतापर्यंत १० लाख कोटी रूपयांची कामे केली आहेत. पण कुठल्याही कंत्राटदाराकडून एक रूपयाही घेतलेला नाही. माझ्यामते राजकारण हे सामाजिक-आर्थिक सुधारणा करण्याचे एक माध्यम आहे. मी कधीच पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिलेले नाही किंवा माझ्या मनात तसा विचारही येत नसल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी अनेक विषयांवर खुलेपणाने आपले मत मांडले. पंतप्रधान मोदींची कार्यपद्धती, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपा यांच्यातील संबंध आदीबाबत त्यांनी माहिती दिली. मंत्रिमंडळाचे निर्णय पंतप्रधान मोदी हे एकट्याने घेतात. त्यांची एकाधिकारशाही चालते, याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, हे अत्यंत चुकीचे आहे. आमचे एक कॅबिनेट आहे. अनेकवेळा आम्ही आमचे मत कॅबिनेटमध्ये बैठकीत मांडतो. काहीवेळा आम्ही पंतप्रधानाच्या मताशी सहमतही नसतो. पण सरकार सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासून जाणूनबुजून मोदींच्या कार्यपद्धतीवर अफवा पसरवण्यात आली आहे.

जर योग्य असेल तर मी स्वत: निर्णय घेतो. जर मी निर्णय घेत असेल तर इतरही तसे करत असतील. मंत्री नेमण्याचे अधिकार पंतप्रधानांना आहेत. त्यांनी आम्हाला अधिकार दिले आहेत. जर आम्ही त्या अधिकारांचा वापर केला नाही तर ती आमची चूक आहे. मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांचे कार्य चांगले आहे. प्रत्येक विभाग चांगले काम करत आहे. पण झाले असे की, माझे काम रस्ते बनवण्याचे आहे आणि सध्या देशातील सगळीकडे कामे सुरू आहेत. त्यामुळे ते दिसून येते.

विरोधी पक्षांची एकता ही आमची ताकद असल्याचे ते म्हणाले. जर आम्ही दुबळे असतो तर ते एकत्र आले नसते. आम्ही त्यांच्याशी लढू, असे ते म्हणाले.

शिवसेना आणि आमच्यात वैचारिक मतभेद नाहीत. तेही हिंदुत्वाबद्दल बोलतात. त्यांची आणि आमची मते एकच आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपाच्या जागा जास्त आहेत. आम्ही तिथे मजबूत आहोत. आम्ही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. पण ते हे वास्तव स्वीकारण्यास तयारच नाहीत. ते फक्त आम्ही मोठे भाऊ आहोत हेच सांगत आहेत. मतभेदाचे हे वैचारिक नव्हे तर राजकीय कारण असल्याचे त्यांनी म्हटले.

काही लोक सत्तेमुळे पक्षाला गर्व आल्याचा प्रचार करत आहेत. पण हे खरे नाही. निवडणुकीच्यावेळी आम्ही आमच्या मित्रांना बरोबर घेऊ असा विश्वासही दिला. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करा असा सल्ला गांधीजींनी दिला होता. पण नेहरू, इंदिरा गांधी, राजीव आणि सोनिया गांधी हे करू शकले नाहीत. पण राहुल यांनी महात्मा गांधींचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे मनावर घेतले असल्याचा उपहासात्मक टोला लगावला.

समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल राहुल यांना पंतप्रधानपदासाठी कधीच मंजुरी देणार नसल्याची भविष्यवाणीही त्यांनी केली. मी माझ्या आयुष्यात कधीच कुठले लक्ष्य ठरवले नव्हते. मी कोणाची हांजीहांजीही केली नाही. आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणारा मी एक साधा व्यक्ती आहे. मी कधीच भ्रष्टाचार केला नाही. मी कधीच पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहिले नाही आणि तसा विचारही आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.