केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबळ पटेल याच्यासह पाच जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगळवारी अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातील गोटेगाव येथे यांनी एका होमगार्डसह चार जणांना मारहाण करत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी पोलिस अद्याप प्रबळचा भाऊ व नरसिंगपूर येथील भाजपाचे आमदार जलाम पटेल यांचा मुलगा मोनू पटेल याचा शोध घेत आहेत. प्रबळच्या नावे या अगोदर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही, मात्र मोनू पटेलचे अनेक प्रकरणांमध्ये नाव आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, मी असे म्हणू शकतो की हे दुःखी आणि दुर्देवी आहे. कायदाच सर्व काही ठरवेल, यावर मी काही अन्य प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.

बेलाई बाजार येथे सोमवारी रात्री ही घटना घडली, जेव्हा प्रबळच्या नेतृत्वात एका गटाने तक्रारदार हिमांशु राठोड आणि त्याच्या मित्रांना अडवले होते. हे पाहून जवळच राहणा-या एका होमगार्डने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यास देखील मारहाण करण्यात आली ज्यात त्याच्या शरीरासह डोक्यास जखम झाली. यानंतर मारहाण झालेल्या होमगार्डने मला गणवेशात असताना मारहाण करण्यात आली असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली.

शिवाय तक्रारदार हिंमाशू याच्या हातास देखील गंभीर दुखापत झाली आहे. प्रबळ आणि त्याच्या सहका-यांनी हिमांशू व त्याच्या मित्रांना एका घरात कोंडून मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी २० जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी १२ जणांची ओळख पटलेली आहे. या १२ जणांना अटक करण्यासाठी पाच पथक गोटेगाव येथे पाठवण्यात आली आहेत. अन्य सात जणांचा शोध घेणे सुरू आहे. नरसिंगपूरचे पोलिस अधिक्षक गुरकरन सिंह यांनी प्रबळ आणि हिंमाशू हे दोघेही आधीपासूनच एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले.