सुधारित नागरिकत्व कायद्याच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी जामिया आणि जेएनयूमधील उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे २२ जानेवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ झालेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही उपस्थिती दर्शवली होती.

भाषणादरम्यान संजीव बालियान यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे जामिया विद्यापीठ आणि जेएनयूमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. जामिया विद्यापीठ आणि जेएनयूमध्ये जे देशविरोधी घोषणा देतात त्यांचा पश्चिम उत्तर प्रदेशवाले नीट उपाय करतील, असंही वक्तव्य संजीव बालियान यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातील एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये बालियान म्हणतात, ‘मी राजनाथ सिंह यांना विनंती करत आहे, जे जामिया आणि जेएनयूमध्ये देशविरोधात घोषणा करत आहेत. त्यांच्यासाठी एकच उपाय आहे. पश्चिम यूपी वाल्यांना येथे १०% आरक्षण द्या, ते सगळ्यांचा इलाज करतील, कोणाचीच गरज लागणार नाही. ‘