उत्तर प्रदेशात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना सर्व काही ठीक असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे. मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केल्याने पोलखोल झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि बरेलीतून लोकसभेवर निवडून गेलेले संतोष गंगवार यांनी उत्तर प्रदेश सरकारची पत्र लिहून कानउघाडणी केली आहे. आरोग्य विभागातील अधिकारी फोन उचलत नसल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्नही त्यांनी आपल्या पत्रात उचलला आहे.

“रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हेलपाटे मारायला लावले जात आहेत. शासकीय रुग्णालयात आल्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात पाठवलं जात आहे. यात रुग्णांची प्रकृती खालावत आहे. करोनाबाधित रुग्णाला कमीत कमी वेळेत रुग्णालयात दाखल केलं पाहीजे”, असं केंद्री मंत्री गंगवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.

उत्तर प्रदेशात करोना कर्फ्यूत वाढ, 17 मेपर्यंत निर्बंध लागू!

“वैद्यकीय उपकरणं दीडपट किंमतीने बाजारात विकली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या वस्तूंच्या किंमती सरकारने निश्चित कराव्यात. करोनाबाधित रुग्णांना बरेलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं पाहीजे. तसेच खासगी रुग्णालयानाही करोना रुग्णालयांसारखी सुविधा दिली पाहीजे”, असंही त्यांनी सांगितलं आहे.”मध्य प्रदेशचं उदाहरण देत सरकारी आणि काही खासगी रुग्णालयांना ५० टक्क्यांपेक्षा कमी किंमतीत ऑक्सिजन यंत्र द्यावं. तसंच लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी आयुष्मान भारत योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात लसीकरण सुरु करावं”, अशा सूचनाही त्यांनी पत्रातून दिल्या आहेत.

“डीआरडीओच्या नव्या औषधानं करोनारुग्ण लवकर बरे होणार”; वैज्ञानिकांनी व्यक्त केला विश्वास

उत्तर प्रदेशात आतापर्यंत १४,८०,३१५ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर १५ हजार १७० जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान करोना संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपासून लागू करण्यात आलेला कर्फ्यू रविवारी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी दिली.