सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), एनआरसी आणि एनपीआरवरून देशभरात घमासान सुरू आहे. एनआरसी आणि सीएए दोन्ही कायदे मुस्लिमविरोधी असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. हा वाद सुरू असतानाच सुधारित नागरिकत्व कायद्याची बाजू मांडताना हिंदूंना इटली थोडीच स्वीकारणार आहे, असा टोला भाजपाचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसला लगावला आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केली. मात्र, यातून मुस्लीम धर्माला वगळण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. या कायद्याविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आली. एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी होत असताना भाजपाचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे.

“जर हिंदू भारतात येणार नाही, तर ते कुठे जाणार? इटली त्यांना थोडीच नागरिकत्व देणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातून येणाऱ्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देणे आणि त्यांचं संरक्षण करणे ही भारताची जबाबदारी आहे,” असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.

इटलीच्या विधानाचा काँग्रेससोबत संबंध काय?

रेड्डी यांनी केलेल्या इटलीचा उल्लेख हा काँग्रेससाठी जिव्हारी लागणारी टीका आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या मूळ इटलीच्या नागरिक आहेत. त्यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून भाजपाकडून काँग्रेसला वारंवार लक्ष्य करण्यात आलं आहे. १९९९मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा राजकारणाच्या चर्चेत आला. भाजपानं त्यावरून काँग्रेसवर टीकाही केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही काँग्रेसपासून दूर गेले, त्यालाही कारणीभूत हाच मुद्दा ठरला होता.