केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये त्यांच्या पत्नी विजया आणि स्वीय सहाय्यकाचा मृत्यू झाला. कर्नाटकमधील अंकोला तालुक्यात हिल्लूर-होसकांबी गावाजवळ झालेला हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. जखमी अवस्थेत अंकोलातील खासगी रुग्णालयात आणण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

या अपघाताला कारणीभूत ठरला तो शॉर्टकट….झालं असं की, नाईक आणि त्यांच्या कुटुंबातील चार जणांनी येळ्ळापूर येथे सकाळी गंटे गणपतीचे दर्शन घेतले आणि पूजा केली. त्यानंतर हे सर्वजण गोकर्णकडे रवाना झाले. राष्ट्रीय महामार्ग-६३ वरून त्यांच्या गाडीने छोटय़ा रस्त्यावरुन शॉर्टकट घेतला. यामुळे ४० किमी अंतर कमी होणार होतं. पण नेमका इथेच घात झाला.

तो रस्ता अतिशय खराब होता त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पलटली. गाडीमध्ये एकूण सहा लोक प्रवास करत होते. या घटनेचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर असून त्यांना प्रथमोपचारानंतर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.