पुढील महिन्यातील पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच ३० जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. ३० जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांना ‘सेल्फ अप्रायझल’ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व मंत्र्यांचा कामाचा आढावा घेतल्यानंतर मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबद्दलचा निर्णय अंतिम करणार आहेत.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथील काही महत्त्वाच्या नेत्यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाऊ शकते आणि सध्या परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना नारळही दिला जाऊ शकतो, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ३० जून रोजी होणारी मंत्रिमंडळाची बैठक जास्त महत्त्वाची ठरणार आहे.
मोदी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मोदी यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या कामकाजाचा स्वतंत्रपणे आढावा घेतलेला आहेच. पण विकासकामांना अधिक गती देण्यासाठी मोदी जास्त प्रयत्नशील असून, त्यामध्ये कोणत्याही मंत्र्यांचा परफॉर्मन्स कमी राहू नये, म्हणून यावेळी एकत्रितपणे सर्वच मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये जी कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत, असेही निर्देश मोदी यांनी दिले आहेत.