३८ जण भेट देणार; विशेष दर्जा रद्द केल्यानंतरच्या लाभांबाबत माहिती

जम्मूत विमान उतरू न शकल्याने केंद्र सरकारमधील तीन मंत्री शनिवारी श्रीनगर येथे दाखल झाले. त्यांचे विमान जम्मूहून श्रीनगरकडे वळवावे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत एकूण ३८ मंत्री जम्मू काश्मीरला सहा दिवसांत भेट देणार आहेत. हे मंत्री ६० सभा घेऊन लोकांना अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या फायद्यांची व सरकारी  योजनांची माहिती देऊन जनजागृती करणार आहेत.

शनिवारी दाखल झालेल्या मंत्र्यात अर्जुन मेघवाल, अश्विनी चौबे, जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. त्यांचे विमान काश्मीरची हिवाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील विमानतळावर उतरले. हे मंत्री येथे मुक्काम करणार की लगेच परत जाणार आहेत हे समजलेले नाही. यानंतर मंत्र्यांचे दुसरे पथक मंगळवारी येथे येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधील जनतेत शांततेचा संदेश पोहोचवण्याची कामगिरी ३८ मंत्र्यांवर सोपवली आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात या भागाचा विकास होणार असून त्यात ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांचा समावेश असेल असे हे मंत्री लोकांना समजावून सांगणार आहेत. या संपर्क कार्यक्रमात एकूण ३८ मंत्री सहभागी होणार असल्याचे मुख्य सचिव बी.व्ही.आर सुब्रमण्यम यांनी जम्मूतील आढावा बैठकीनंतर सांगितले.

हे मंत्री काश्मीरला १८ ते २४ जानेवारी दरम्यान भेट देणार आहेत. जम्मूत  ५१ तर श्रीनगरमध्ये ८ भेटी दिल्या जाणार आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या १९ जानेवारीला कटरा व पंथाल या रियासी जिल्ह्य़ातील भागांना भेट देणार आहेत त्याच दिवशी पीयूष गोयल हे श्रीनगरला भेट देतील. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी हे २२ जानेवारीला गंदेरबल व २३ जानेवारीला मणीगाम येथे, कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद हे सोपोर येथे २४ जानेवारीला सभा घेतील.

पंतप्रधानांच्या आवाहनानुसार मंत्र्यांचे दौरे

नवी दिल्ली येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी यांनी काश्मीरमध्ये जाऊन लोकांना शांतता व विकासाचा संदेश देण्याचे आदेश मंत्र्यांना दिले आहेत. केंद्रांच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या लोकांना देण्यात यावी. मंत्र्यांनी केवळ शहरी भागात न फिरता ग्रामीण भागातही फिरून विकास कामांची माहिती द्यावी, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली आहे.