‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतलं आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब यांना अटक केल्यानंतर यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनाही या प्रकरणासंदर्भात ट्विटरवरुन भाष्य करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. मात्र या प्रकरणासंदर्भात बोलणारे भाजपा नेते भाजपाशासित राज्यांमध्ये अनेक डझन पत्रकारांना अटक झाली तेव्हा कुठे होते असा प्रश्न ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

अर्णब यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक भाजपा नेत्यांनी यावर भाष्य केलं. यावरुनच प्रशांत भूषण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री समोर आले आहेत ते खूपच हृदयस्पर्शी आहे, विशेष करुन त्यांनी या आणीबाणी म्हणणं. भाजपाच्या सरकारांनी यापूर्वी अनेक पत्रकारांना अटक केली तेव्हा हे (भाजपा नेते) काहीच बोलले नाहीत. तसेच त्यांच्या एनआयए, सीबीआय, ईडी आणि पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांचा छळ केला किंवा अटक केली तेव्हाही ते काही बोलले नाही,” असं भूषण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांनी ट्विटरवरुन, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे”, असं म्हटलं आहे.

भाजपाच्या कोणकोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केली टीका

स्मृती इराणी
अनुराग ठाकूर
प्रकाश जावडेकर
एस. जयशंकर
जे. पी. नड्डा (भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष)