भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे प्रकाशझोतात राहिलेले माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग आता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे गोत्यात आले आहेत. लष्करप्रमुख असताना लष्कराच्या गुप्तचर विभागामार्फत जम्मू-काश्मीर सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सिंग यांनी केल्याचा ठपका लष्कराच्या चौकशी समितीने ठेवला आहे. या पथकाने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांचे फोन टॅपिंग केले तसेच राज्य सरकार पाडण्यासाठी एका मंत्र्याला पैसे पुरवल्याचेही समितीच्या अहवालातून उघड झाले आहे. केंद्र सरकारने  प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत.
सिंग यांनी पदावर असताना स्थापन केलेल्या तांत्रिक सेवा विभाग (टीएसडी) या गुप्तचर विभागाला मिळणाऱ्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याची बाब लष्कर व्यवहाराचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद भाटीया यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीच्या तपासात उघड झाली. विशेष म्हणजे, या विभागाला मिळणाऱ्या निधीतून जम्मू काश्मीरचे कृषिमंत्री गुलाम हसन मीर यांना राज्य सरकार पाडण्यासाठी लाच देण्यात आल्याचेही या समितीने म्हटले आहे. तसेच टीएसडीमार्फत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे फोन टॅप केले जात असल्याचेही तपासादरम्यान उघड झाले. याशिवाय व्ही. के. सिंग यांच्यानंतर लष्करप्रमुखपदाचे दावेदार मानले जाणारे विक्रम सिंग यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेला पैसे पुरवून त्यांच्या विरोधात याचिका करण्यात आल्याचेही चौकशीत उघड झाले.
अभ्यासानंतर चौकशीचा निर्णय
या संपूर्ण प्रकरणाचा गौप्यस्फोट ‘इंडियन एक्स्प्रेस’मधून झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली. या वृत्ताला केंद्र सरकारनेही दुजोरा दिला आहे. लष्कराच्या मुख्यालयाकडून मिळालेल्या अहवालाचे तपशीलवार अवलोकन केल्यानंतरच कोणती कारवाई करायची याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशू कर यांनी दिली.
भाजपचा आरोप :  हा अहवाल उघड करण्यामागे केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपने केला आहे. हरयाणातील माजी सैनिकांच्या मेळाव्यात सिंग हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होते. त्यामुळेच सिंग यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’मधील बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा