उत्तर कोरियाने रविवारी केलेल्या अणुचाचणीचा धसका घेत संयुक्त राष्ट्रांकडून तातडीची बैठक बोलवण्यात आली. संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी ट्विटद्दारे रविवारी रात्री या बैठकीची माहिती दिली. या ट्विटमध्ये जपान, युके आणि दक्षिण कोरिया या देशांसह आम्ही सुरक्षा परिषदेची उद्या तातडीची बैठक बोलावल्याचे त्यांनी म्हटले आहे.


उत्तर कोरियाने सहावी अणुचाचणी केल्यानंतर दोन्ही नेत्यात चर्चा झाली असून हायड्रोजन बॉम्बची चाचणी अचूक झाल्याचे उत्तर कोरियाने म्हटले होते. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे ठेवून अमेरिकेतही हल्ला करू शकतो, असा दावाही उत्तर कोरियाने केला होता.

अमेरिकेनेही त्याला प्रत्युत्तर दिले. जगाला हादरवून सोडणाऱ्या कृत्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाल्यास कडक कारवाई करू, असे अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी सांगितले. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. परिषदेतील सर्व सदस्य देशांनी उत्तर कोरियाकडून धोका असल्याचे मान्य केले आहे. त्याचबरोबर त्यांनी परिषदेतील ठरावाशी बांधिलकी राखत कोरियन द्वीपकल्पात अणुशस्त्रांचा वापर न करण्याचे वचन दिले आहे. यामागे एखाद्या राष्ट्राचा संपूर्ण विनाश आम्हाला मान्य नाही, असे मॅटिस यांनी म्हटले.

तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर कोरिया हे खूपच हेकेखोर राष्ट्र असून त्यांची ही सततची कृत्ये अमेरिकेसाठी धोकादायक आहेत. यामुळे चीनसमोरही पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, असेही ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्याचबरोबर उत्तर कोरियावर व्यापारी निर्बंध लादण्याची ट्रम्प यांनी दिलेली धमकी स्वीकारार्ह नाही तसेच ही बाब चुकीची असल्याचे चीनने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.