पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्काराने गौरव केला आहे. ‘पॉलिटिकल लीडरशीप’ या विभागात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना पर्यावरणसंबंधी जागतिक करार करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना २०२२ पर्यंत देशात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्धाराबद्दल हा पुरस्कार दिला आहे. केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात आला आहे. अक्षय उर्जेच्या दिशेने पावले टाकल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

पर्यावरणसंदर्भात जागतिक स्तरावर प्रभावी नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२ पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा दृढनिश्चय केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. तर केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारे विमानतळ आहे.