अफगाणिस्तान-पाकिस्तानातील हल्ल्यांमुळे संयुक्त राष्ट्रांचा निर्णय

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांनी आयसिसच्या दक्षिण आशिया शाखेवर निर्बंध जारी केले आहेत. पाकिस्तानी नागरिक व टीटीपीच्या  माजी कमांडरने स्थापन केलेला हा गट असून त्याचे अल कायदाशी संबंध आहेत. अफगाणिस्तान व पाकिस्तानात या गटाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये आतापर्यंत दीडशे लोक ठार झाले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या १२६७ अल कायदा निर्बंध समितीची बैठक मंगळवारी होऊन त्यात  आयसिल- के (इस्लामिक स्टेट इन इराक अँड द लेव्हंट-खोरासन) या संघटनेवर बंदी घातली आहे. यात आयसिस साउथ आशिया, आयसिल खोरासन, इस्लामिक स्टेटस खोरासान प्रोव्हिन्स, आयसिल आशियन चॅप्टर यांचा समावेश आहे. जैश ए मंहमदचा म्होरक्या मसूद अझर याला १ मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीने जागतिक दहशतवादी ठरवल्यानंतर दोन आठवडय़ांनी ही कारवाई करण्यात आली असून ‘आयसिस-के’ नेअल बगदादी याच्याशी एकनिष्ठता राखली असून त्याला खोरासान प्रांताचा प्रमुख नेमले आहे.

अफगाणिस्तानात काबूल येथे २०१७ मध्ये आत्मघाती हल्ल्यात या संघटनेने ४१ जणांना ठार केले होते.  त्यात महिला व मुलांचा समावेश होता. पाकिस्तानात क्वेट्टा येथे २०१८ मध्ये केलेल्या हल्ल्यात या गटाने ३१ जणांना ठार केले होते त्यात २४ जखमी झाले होते. लष्कर ए तोयबा, जमात उद दवा, हक्कानी नेटवर्क व इस्लामिक मुव्हमेंट ऑफ अफगाणिस्तान या संघटनांचे काही दहशतवादी आयसिसमध्ये सामील झाले आहेत.