आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची होणारी फजिती ही काही नवी नाही. अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानने आपली फजिती करून घेतली आहे. यापूर्वी इम्रान खान यांनीही ट्विटरवरून आपल्याला काश्मीरप्रश्नी यूएनजीसीच्या सदस्य देशांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यांनी सदस्य देशांपेक्षा अधिक देशांची संख्या सांगितल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी सदस्या मलिहा लोधी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची फजिती झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा त्यांनी परराष्ट्र मंत्री असा उल्लेख केला. पंतप्रधान इम्रान खान यांनी आज ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांची भेट घेतली, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

पंतप्रधान इम्रान खान आणि बोरिस जॉन्सन यांच्या बैठकीचा एक फोटो मलिहा लोधी यांनी ट्विट केला. त्यांच्या या ट्विटवरून अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी तो फोटो डिलिट केला. त्या ट्विटमध्ये लोधी यांनी बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री असा उल्लेख केला होता. त्यानंतर ते ट्विट डिलिट करत पुन्हा त्यांनी एक नवं ट्विट केलं. यापूर्वी करण्यात आलेल्या ट्विटबद्दल त्यांनी माफी मागितली. त्यांच्या ट्विटनंतर पाकिस्तानी युझर्सनेही त्यांना ट्रोल केलं.

लोधी यांच्यामुळे पहिल्यांदाच पाकिस्तानची फजिती झालेली नाही. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीदरम्यान एका जखमी मुलीचा फोटो दाखवत हा काश्मीरमधील क्रुरतेचा पुरावा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर फोटोमध्ये असलेली मुलगी ही इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झाली असल्याची माहिती समोर आली होती. तो फोटो 2014 मध्ये फोटोग्राफर हेदी लेव्हीन यांनी काढला होता. त्यानंतरही नेटकऱ्यांनी लोधी यांना चांगलंच झापलं होतं.