काश्मीर हा द्विपक्षीय चर्चेचा प्रश्न!

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) चीनच्या जिवावर पुन्हा एकदा काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान अन्य देशांच्या पाठिंब्याअभावी तोंडघशी पडला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सदस्य देशांनी, काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानातील द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केल्याने काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न निष्फळ ठरले. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी बुधवारी केवळ एकटा चीनच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला; परंतु काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न असल्याचे मत सदस्य देशांनी व्यक्त केल्याने काश्मीरच्या मुद्दय़ावर चर्चा घडवून आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला.

सुरक्षा परिषद सल्लागार कक्षामध्ये गुप्त चर्चा करताना चीनने ‘अन्य प्रश्न’ या  विषयांखाली काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी-राजदूत सईद अकबरुद्दीन म्हणाले, एका सदस्य देशाने पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, चीनच्या मदतीने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानलाही भारताने फटकारले आहे. निराधार आरोप करणे आणि काश्मीर खोऱ्यातील स्थिती धोकादायक असल्याचा कांगावा करण्याचे प्रकार पाकिस्तानने थांबवावेत, असेही भारताने म्हटले आहे.

चीनने उठाठेव करू नये!

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने गुरुवारी पुन्हा एकदा फटकारले. चीनने याबाबत जागतिक मताचा गंभीरपणे विचार करावा आणि भविष्यात अशा प्रकारचे कृत्य टाळावे, असे भारताने सुनावले.

भारताशी संबंधित अनेक मुद्दय़ांवर पाकिस्तानकडे द्विपक्षीय चर्चेचा पर्याय उपलब्ध असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिले. त्याबद्दल भारत समाधानी आहे.

– सईद अकबरुद्दीन,  भारताचे राजदूत, संयुक्त राष्ट्रे