भारतातील अगस्त्यमाला या जैवावरणाचा समावेश संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या संस्थेने त्यांच्या जागतिक जैवावरण प्रणालीमध्ये केला आहे. युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय समन्वय मंडळाची बैठक पेरूची राजधानी लिमा येथे झाली. त्यात जैवावरणांची संख्या वाढवण्यात आली असून १२० देशांमधील ६६९ जैवावरणांचा समावेश त्यात आहे त्यातील १६ हे आंतरदेशीय आहेत.

नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या जैवावरणात नवीन अठरा ठिकाणांचा समावेश असून एक जैवावरण हे स्पेन व पोर्तुगाल यांच्यात संयुक्त आहे. पश्चिम घाटातील अगस्त्यमाला जीवावरणाचा समावेश आताच्या यादीत करण्यात आला असून ते ठिकाण समुद्रसपाटीपासून १८६८ मीटर उंचीवर आहे. त्यात उष्णकटीबंधीय जंगलांचा समावेश असून वनस्पतींच्या २२५४ प्रजाती तेथे आहेत. त्यातील ४०० प्रजाती मूळ तेथीलच आहेत. या जैवावरणाचे वैशिष्टय़ म्हणजे तेथे वेलदोडा, जायफळ, मिरी, जांभळे या वनस्पती व झाडे तेथे आहेत. शेंदुर्णी, पेप्परा, नेय्यार, कलाकाड मुंदनथुराई व्याघ्र प्रकल्प यांचाही त्यात समावेश आहे. अगस्त्यमाला जैवावरण हे केरळ व तामिळनाडूत पसरलेले असून नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर त्यात केला जातो. अगस्त्यमाला जैवावरणात ३००० लोकांचे वास्तव्य आहे ते जैविक स्रोतांवर अवलंबून आहेत. भारतात १८ जैवावरणे असून त्यातील नऊ जैवावरण युनेस्कोच्या यादीत आहेत, त्यात निलग्रिस, नंदादेवी, नोक्रेक, मन्नारचे आखात, सुंदरबन, ग्रेट निकोबार यांचा समावेश आहे. भारतातील आरक्षित जैवावरणात नॅशनल पार्क, नैसर्गिक अधिवास,  यांचा अंतर्भाव असून तेथील वनस्पती, प्राणी तसेच मानवी समुदायांना व त्यांच्या शाश्वत जीवनशैलीला कायदेशीर संरक्षण दिलेले आहे.