पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद विरोधात भारताला कूटनीतिक पातळीवर मोठे यश मिळताना दिसत आहे. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. जैशने भारताचे अर्धसैनिक दल सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, असे या प्रस्तावात म्हटले आहे. मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे.

मसूद अझहरविरोधात शस्त्रास्त्र बंदी, त्याच्या जागतिक प्रवासावर बंदी घालावी तसेच त्याची संपत्तीही जप्त करावी, असे अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रतिबंध समितीला म्हटले आहे. ‘व्हेटो पॉवर’ असलेल्या या तीन देशांनी मिळून हा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रात मागील १० वर्षांत चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली जाणार आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रात हा प्रस्ताव मंजूर होईल की नाही हे पाकिस्तानचा मित्र चीनवर अवलंबून असेल. चीन व्हेटो पॉवर असलेल्या सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असून अनेकवेळा मसूदविरोधात आणलेल्या प्रस्तावाला त्यांनी विरोध केलेला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य देश चीनने पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या नावाचा उल्लेख केलेल्या निवेदनाला महत्व दिले नव्हते.