28 February 2021

News Flash

विरोधकांच्या एकीत भाजप पराभूत

‘आरएलडी’ला सप, बसप, काँग्रेस या सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता.

(संग्रहित छायाचित्र)

कैरानात नामुष्की, इतरत्रही हार

नवी दिल्ली :  दहा राज्यांत झालेल्या चार लोकसभा आणि ११ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला विरोधकांच्या एकीने जबरदस्त दणका दिला! भाजपला पालघर लोकसभा आणि उत्तराखंडमध्ये थराली विधानसभा अशा दोनच जागाजिंकता आल्या, उर्वरित १३ जागांवर विरोधकांचे उमेदवार मतांच्या मोठय़ा फरकाने निवडून आले. भाजपसाठी सर्वात नामुष्कीजनक पराभव उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात झाला. राष्ट्रीय लोक दलाच्या तब्बसुम बेगम या मुस्लीम उमेदवाराने भाजपच्या मृगंका सिंह यांना तब्बल ४५ हजार मतांच्या फरकाने पराजित केले.

‘आरएलडी’ला सप, बसप, काँग्रेस या सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. विरोधकांची एकी सांभाळण्यासाठी काँग्रेसने कैराना लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा केलेला नव्हता. गोरखपूर आणि फूलपूर या लोकसभा पोटनिवडणुकीत सप आणि बसपने एकत्र येत भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. बुधवारी भाजपला तिसऱ्याही पोटनिवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वासाठी कैरानाची पोटनिवडणूक महत्त्वाची मानली जात होती, मात्र मोक्याच्या मतदारसंघात आदित्यनाथांची नाचक्की झाली.

१५ पैकी फक्त दोन जागा

कर्नाटक विधानसभेत भाजपला सत्ता स्थापण्यात अपयश आल्यानंतर विरोधकांच्या एकीकडे देशातील मतदारांचे लक्ष केंद्रित झाले होते. त्यादृष्टीने पोटनिवडणुकीचे निकाल महत्त्वाचे मानले जात होते. बुधवारी १५ मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत गेले तसे विरोधकांचे चेहरे खुलले होते. भाजपला मात्र पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. त्यात फक्त किंचित समाधान लाभले ते म्हणजे नागालँडमध्ये. नागालँड लोकसभा मतदारसंघात भाजपचे समर्थन असलेले एनडीपीपीचे उमेदवार तोखेहो हे निवडून आले. भाजपने उत्तराखंडमध्ये थराली विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून गड राखला. बाकी सर्व मतदारसंघात भाजपच्या पदरी अपयशच पडले.

आपापले गड राखले!

उर्वरित विधानसभा मतदारसंघांत विरोधी पक्षांनी आपापले मतदारसंघ राखले आहेत. मेघालयमध्ये अंपाथी, कर्नाटकातील राजाराजेश्वरीनगर, पंजाबमध्ये शाहकोट, महाराष्ट्रात पलूस-कडेगाव हे चार मतदारसंघ काँग्रेसने हातातून निसटू दिले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये महेशतळा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसने तर, झारखंडमध्ये गोमिया आणि सिल्ली हे दोन मतदारसंघ झारखंड मुक्ती मोर्चाने राखले. केरळमधील चेंगन्नूर मतदारसंघावर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पकड कायम ठेवली. नूरपूर विधानसभा मतदारसंघातील वर्चस्व समाजवादी पक्षाने कायम ठेवले.

बिहारमध्ये नितीशकुमार यांचा दणका

बिहारमध्ये जोकीहाट मतदारसंघ राष्ट्रीय जनता दलाने नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून हिसकावून घेतला आणि नितीशकुमार यांना जबरदस्त दणका दिला. आरजेडीचे नेते आणि लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी हा लालूवादाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी झेप घेण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते, आता पुन्हा आम्ही मोठी झेप घेऊ

-राजनाथ सिंह, भाजप नेते

मोदी सरकारच्या विरोधात लोकांमध्ये किती राग आहे हे पोटनिवडणुकींच्या निकालावरून स्पष्ट होते. लोक विचारत होते पर्याय कोण आहे? आता लोक म्हणतात, आधी मोदींना हटवा मग, पर्याय शोधू.

-अरविंद केजरीवाल, ‘आप’चे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:29 am

Web Title: united opposition serves another blow to bjp stops saffron poll juggernaut
Next Stories
1 गौरी लंकेश हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
2 व्यसनमुक्तीसाठी व्यायाम आवश्यक!
3 लोकांना जाणवतीये मनमोहन यांच्यासारख्या सुशिक्षित पंतप्रधानाची कमकरता – अरविंद केजरीवाल
Just Now!
X