युनायटेड ब्रेव्हरीज (युबी) समूहातील अन्य कंपन्यांना तसेच किंगफिशरला निधी वळविल्याचा आरोप करून ‘डियागो’च्या अखत्यारीतील युनायटेज स्पिरीट कंपनीने (युएसएल) त्यांचे माजी प्रवर्तक व विद्यमान अध्यक्ष विजय मल्ल्या यांना शनिवारी राजीनामा देण्याची सूचना केली. परंतु हा आरोप फेटाळून लावत मल्ल्या यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार दिला.
‘युनायटेड स्पिरीट्स लिमिटेड’ कंपनीत ‘डियागो’ चे ५५ टक्के समभाग असून त्यासाठी त्यांनी तीन अब्ज अमेरिकी डॉलर गुंतविले आहेत. ‘युएसएल’ कंपनीने ‘युबी’ समुहातील कंपन्यांना सुमारे १,३३७ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्या व्यवहारांची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते.‘डियागो’ कंपनीने चौकशी सुरू केल्यानंतर अनेक संचालकांनाही रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यानंतर आता विजय मल्ल्या यांनाही पायउतार होण्याची सूचना ‘डियागो’ कंपनीने केली परंतु मल्ल्या यांनी त्यास वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत.