अमेरिकेत गेल्या २४ तासांत १९२९ बळी गेले असून एकूण मृतांची संख्या १२८५७ वर गेली आहे, तर रुग्णांची संख्या ४००५४९ आहे. जगातील बळींची संख्या आता ८३४०१ वर पोहोचली आहे.

नवीन अंदाजानुसार पूर्वी अनुमान केल्यापेक्षा कमी बळी जाण्याची शक्यता आहे, असे  अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आधीच्या अंदाजात सांगण्यात आले होते की, येत्या दोन आठवडय़ात अमेरिकेत १ ते २ लाख लोक मृत्युमुखी पडतील. आधीच्या अंदाजापेक्षा कमी बळी जातील असे दिसते आहे. प्राणहानी कमी होण्याची चिन्हे असली तरी आताच त्याबाबत ठाम निष्कर्ष काढता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेतील रुग्णांची संख्या चार लाखांच्या आसपास असून जगातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. न्यूयॉर्क हे अमेरिकेत करोनाचे प्रमुख केंद्र ठरले असून तेथे ५४०० बळी गेले आहेत. तर एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार आहे. न्यूजर्सीत १२०० बळी गेले आहेत तर रुग्णांची संख्या ४४४१६ आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की पुढील आठवडय़ात मृत व बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, पण कठोर उपाययोजनांमुळे तो कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिकेत ३३ कोटी लोकांपैकी ९७ टक्के लोक करोनामुळे घरात बंदिस्त आहेत.

न्यूयॉर्क मेट्रो भाग, न्यूजर्सी, लाँग आयलंड, कनेक्टिकट, न्यूऑर्लिन्स, डेट्रॉइट, बोस्टन, शिकागो व डेन्व्हर येथे रुग्णांची संख्या स्थिरावत आहे. अमेरिकेत सामाजिक अंतर राखण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सीडीसीचे डॉ. रॉबर्ट रेडफील्ड यांच्या मते नवीन प्रतिमानानुसार मृतांचा आकडा लाखाच्या खाली राहणार आहे. आधीच्या अंदाजानुसार १ ते २ लाख बळी जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण तसे काही होणार नाही.

ब्रिटनच्या पंतप्रधानांची प्रकृती स्थिर

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनामुळे अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून ते प्रतिसादही देत आहेत असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.  जॉन्सन (वय ५५) यांना सेंट थॉमस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रविवारी दाखल करण्यात आले असून, प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, करोनाचा सामना करण्याची  जिद्दही चांगली आहे असे आरोग्य राज्यमंत्री एडवर्ड अरगर यांनी म्हटले आहे.

वुहानमधील निर्बंध उठवले!

चीनमध्ये करोना साथीनंतर ७३ दिवसांची टाळेबंदी उठवण्यात आली असून वुहानमध्ये हजारो लोकांनी बुधवारी नेहमीप्रमाणे प्रवासास सुरुवात केली आहे.  चीनने निर्बंध उठवले असले तरी तेथे नवीन १९ रुग्ण सापडले असून देशातील नवीन रुग्णांची संख्या हजार आहे तर दोन जणांचे बळी गेले आहेत. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची भीती कायम असताना वुहानमधील निर्बंध उठवण्यात आले आहेत.  चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी एकूण ६२ नवीन रुग्ण सापडले असून त्यातील ५९ परदेशातून परतलेले लोक आहेत. परदेशातून आलेल्या  एकूण रुग्णांची संख्या आता १०४२ झाली आहे. देशांतर्गत तीन नवीन रुग्ण सापडले. मंगळवारी लक्षणे नसलेले १३७ नवीन रुग्ण सापडले.