करोना विषाणूने सर्वाधिक प्रभावित अमेरिका झाली असून आतापर्यंत ६३ हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, १० लाखांहून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील कुठल्याही देशातील ही सर्वाधिक संख्या आहे. अमेरिकेसाठी दिलासादाक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख ५५ हजार जणांनी या महामारीचा पराभव केला आहे.

worldometers च्या आकडेवारीनुसार, ३० एप्रिल रोजी दोन हजार दोनशे लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील न्यूयार्क शहरात करोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. न्यूयार्कमध्ये आतापर्यंत २३ हजार जणांचा बळी गेला आहे. तर तीन लांखांना या महामारीनं ग्रासलं आहे. न्यूयार्कपाठोपाठ न्यूजर्सीमध्ये सात हजारांपेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे.

२० वर्षे चाललेल्या व्हिएतनाम युद्धात ५८ हजार २२० अमेरिकी सैनिक मरण पावले होते. तो आकडा अमेरिकेने बुधवारी पार केला. मात्र, १९१८ सालच्या फ्लूच्या महासाथीत अमेरिकेतील ६ लाख ७५ हजार लोक मृत्युमुखी पडले होते, त्यापेक्षा हा आकडा बराच कमी आहे.

अमेरिकेतील करोनाबळींची संख्या गुरुवारी ६० हजारांपलीकडे पोहचली. ही संख्या आणखी वाढणार हे निश्चित आहे. देशातील करोनाबळींची एकूण संख्या ६० हजारांपर्यंत राहू शकेल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडच्या काही दिवसांत सांगितले होते. अमेरिकेत करोनामुळे १ लाख ते २.४० लाख लोकांचा मृत्यू होऊ शकेल, असा इशारा व्हाइट हाऊसने पूर्वी दिला होता. त्याच्या तुलनेत अमेरिका करोनाविरोधी उपाययोजनेत यश मिळवेल, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते.

करोनाच्या महासाथीने प्रभावित झालेल्या अमेरिकेच्या ५० पैकी ३५ राज्यांनी सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या औपचारिक योजना जाहीर केल्या असून; ‘अदृश्य शत्रूने’ जोरदार फटका दिलेल्या या देशासाठी ‘यापेक्षा बरेच चांगले दिवस’ पुढे वाढून ठेवले आहेत, असा विश्वास अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.