संयुक्त राष्ट्रांना सूचना पाठवली

पॅरिस येथे २०१५ मध्ये मान्य करण्यात आलेल्या हवामान करारातून माघार घेत असल्याचा इरादा अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना कळवला आहे. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी पॅरिस करारातून माघारीचे सूतोवाच आधीच केले होते पण ते हा निर्णय बदलतील अशी अपेक्षा होती. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी त्यांना तशी विनंतीही केली होती पण ट्रम्प यांनी त्यांचेच म्हणणे खरे केले आहे.

ट्रम्प यांनी पॅरिस करारातून माघारीची घोषणा केल्यानंतर दोन महिन्यांनी संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या माघारीचा इरादा दर्शवणाऱ्या औपचारिक सूचनेची घोषणा केली आहे. पॅरिस करारात कायम राहण्याबाबत ट्रम्प यांनी अनेक जागतिक नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली हे खरे असले तरी ४ नोव्हेंबर २०२० पर्यंत अमेरिकेला यातून पूर्णपणे माघार घेता येणार नाही. पुढील अध्यक्षीय निवडणुकीनंतरच त्यांना तसे करता येईल, याचा अर्थ पॅरिस करारात पुन्हा सहभागी होण्यासाठी ट्रम्प यांना बराच कालावधी हाताशी आहे. अमेरिकेच्या माघारीच्या सूचनेवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी सांगितले की, २०१५ च्या पॅरिस हवामान करारात अमेरिकेने पुन्हा सहभागी व्हावे. पॅरिस हवामान करारात पृथ्वीचे तापमान औद्योगिक क्रांतीच्या काळापासूनच्या तापमानापेक्षा दोन अंशांनी वाढण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची तरतूद होती. तापमान वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनात चीननंतर अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक आहे. ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून माघार घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला होता पण तरीही या करारामुळे अमेरिकेला शिक्षा झाली असून त्यामुळे लाखो अमेरिकी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील असे कारण सांगून त्यांनी माघारीचा हट्ट कायम ठेवला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने काल असे सांगितले की, या करारातून कायदेशीरदृष्टय़ा शक्य असेल तितक्या लवकर माघारीचा आमचा उद्देश आहे. या करारात अमेरिकेला अनुकूल तरतुदी केल्या तर या करारात पुन्हा सामील होण्याची तयारी ट्रम्प यांनी १ जूनला दर्शवली होती.