अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर जी-२० शिखर परिषदेदरम्यान होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द केली आहे. रशियाने युक्रेनचे जहाज आणि नाविकांना मुक्त न केल्यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. रशियाने युक्रेनला जहाजे आणि नाविकांना मुक्त केलेले नाही. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द होणे चांगले राहील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले की, जर ही समस्या सोडवली तर मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची परिषदेत भेट घेईन. दरम्यान, काही वेळापूर्वी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शिखर परिषदेत पुतीन यांची भेट घेण्याची सर्वांत चांगली वेळ असल्याचे म्हटले होते. कदाचित मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊ शकतो. मी ती बैठक रद्द केलेली नाही. मी असा विचार करत होतो. पण मी असे केलेले नाही. मला वाटते बैठकीसाठी ही चांगली वेळ आहे.

अर्जेंटिनाला डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान उड्डाण करण्याच्या काही क्षण आधी व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी ही बैठक रद्द झाल्याचे सांगितले. या आठवड्याच्या अखेरीस ब्यूनस आयर्स येथे जी-२० शिखर परिषदेत पुतीन यांना भेटण्याचे ट्रम्प यांचे नियोजन होते.