United States President Donald Trump comes to First Lady Melania Trumps rescue over I REALLY DON’T CARE DO U jacket row: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी म्हणजे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यातील ‘तू तू मै मै’ जगजाहीर आहे. मात्र यावेळेस एका जॅकेटवरून मेलानिया यांना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले असता ट्रम्प स्वत: तिच्या मदतीला धावून आले आहेत.

अमेरिका-मेक्सिको सिमेवरील निर्वासितांच्या छावणीमधील लहान मुलांची मेलानिया यांनी नुकतीच भेट घेतली. मात्र या भेटीला जाताना मेलिनिया यांनी घातलेल्या जॅकेटमुळे नवीन वाद ओढावला आहे. मेलिनिया यांनी घातलेल्या ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या जॅकेटवर ‘मी खरंच (तसल्या गोष्टींची) काळजी करत नाही, तुम्ही करता का?’ (I REALLY DON’T CARE, DO U?) असं लिहिलेलं आहे. निर्वासितांबद्दल ट्रम्प प्रशासनाने शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारल्याने राष्ट्राध्यक्षांवर टिका होत असतानाच मेलानिया यांनी मुद्दाम अशाप्रकारचा संदेश असणारे जॅकेट घातल्याची टिका नेटकऱ्यांनी केली आहे. मात्र मेलानिया यांच्यावर होणाऱ्या टिकेला थेट राष्ट्राध्यक्षांनी आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून ट्विट करुन टिकाकारांना आणि ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

आपल्या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी मेलानियाची बाजू घेतली आहे. ‘मेलानियाच्या जॅकेटवर लिहीलेलं ‘I REALLY DON’T CARE, DO U?’ हे वाक्य खोट्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांसाठी आहे. ही प्रसारमाध्यमे किती खोटी आहेत हे तिला समजले आहे. म्हणून आता तीने त्यांच्याबद्दल काळजी करणे सोडून दिले आहे’ असं ट्रम्प आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

प्रसारमाध्यमांनीही मेलानिया यांच्या या कपड्यांच्या निवडीवर संवेदनशून्य असल्याची टिका केली होती. त्यावरून ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांना सुनावले आहे.

या दौऱ्यानंतर मेलानिया यांनी ट्विट करून काही फोटो शेअर केले आहेत. मात्र नेटकऱ्यांनी तेथेही त्यांच्या असंवेदनशील कपड्यांच्या निवडणीवरून सुनावले आहे.

मात्र मेलानिया यांच्या या जॅकेटमुळे समाजमाध्यमांवर ट्रम्प दाम्पत्य टिकेचे धनी ठरले आहे. अनेकांनी तर मेलानियाला काळजी नसली तरी आम्हाला आहे अशा आशयाचे ट्विटस केले आहेत. पत्रकार असणाऱ्या पार्कर मोली यांनी तर थेट आय रियली डू केअर डॉट कॉम नावाचे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर निर्वासितांसाठी देणगी देता येईल असा १४ स्वयंसेवी संस्थांची माहिती देण्यात आली आहे.

तर काहींनी या प्रकरणातही श्री व सौ. ट्रम्प यांच्या नात्यातील दुराव्यावर बोट ठेवत, मेलेनिया यांची मस्करी करु नका, ‘I REALLY DON’T CARE, DO U?’ हे त्यांच्या लग्नामधील एक वचन असल्याचा खोचक टोमणाही मारला आहे.

ट्रम्प सरकारच्या नवीन शून्य सहिष्णुता धोरणानुसार निर्वासितांच्या लहान मुलांना देशात प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच त्यांच्या पालकांना कैद्यांचा दर्जा देण्यात आला आहे. या लहान मुलांना ‘सोबत आलेले अल्पवयीन’ असे संबोधण्यात येणार असून त्यांना सरकारच्या ताब्यातील संगोपन केंद्रात पाठवण्यात येईल अथवा त्यांचे दत्तक पद्धतीने संगोपन करण्यात येईल असे नवीन नियम बनवण्यात आले आहेत.