अमेरिकेतील सीआयएचा माजी एजंट व एनएसएचा कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याला हाँगकाँगच्या बाहेर जाऊ देण्यात चीनचा हात आहे, असा संशय हाँगकाँगच्या एका वकिलाने व्यक्त केला आहे. दरम्यान स्नोडेनला आश्रय दिला तर याद राखा असा इशारा अमेरिकेने संबंधित देशांना दिला असून स्नोडेन याचा पासपोर्ट रद्द केला आहे. स्नोडेन याने मॉस्कोतून एरोफ्लोट कंपनीच्या विमानाने हवानाकडे प्रयाण केले असून तो क्यूबा, इक्वेडोर किंवा व्हेनेझुएला या तीन पैकी एका देशात आश्रय घेण्याची शक्यता आहे.
हाँगकाँगचे लोकशाहीवादी लोकप्रतिनिधी अल्बर्ट हो यांनी सांगितले की, स्नोडेनला एक व्यक्ती संदेश घेऊन भेटली होती व त्याला देश सोडून आपणास सुरक्षितपणे जाऊ दिले जाईल असे म्हटले होते. ती मध्यस्थ व्यक्ती हाँगकाँगची होती की चीनची हे समजू शकलेले नाही. मात्र आपण स्नोडेनचे वकील म्हणून काम केले होते अशी कबुली हो यांनी दिली आहे.
स्नोडेनला विमानतळावर जाण्यापासून न रोखण्यात हाँगकाँग सरकारचा काही हात आहे असे वाटत नाही. चीननेच पडद्यामागे राहून सूत्रे हलवली असावीत कारण स्नोडेनला उघडपणे मदत करून अमेरिका-चीन संबंध बिघडवण्याची त्यांची इच्छा नाही असे हो यांनी सांगितले.
अमेरिकी सिनेटच्या गुप्तचर समितीच्या अध्यक्षा डायन फेनस्टेन यांनी सांगितले की, ही अतिशय आश्चर्यकारक घडामोड आहे. स्नोडेनच्या पलायनात चीनचा सहभाग आहे यात शंका नाही, चीनच्या पाठिंब्याशिवाय तो जाणे शक्यच नाही असे त्यांनी सीबीएसच्या फेस द नेशन कार्यक्रमात सांगितले.
फरारी एडवर्ड स्नोडेनला आश्रय देण्याचे टाळावे असा इशारा अमेरिकेने दिला आहे. परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, राजनैतिक व कायदा अंमलबजावणी संस्थांच्या मदतीने अमेरिका पश्चिम अर्धगोलार्धातील देशांच्या संपर्कात असून स्नोडेनला कुठेही आश्रय मिळू नये यासाठी प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेचे सिनेटर शुमर यांनी असा इशारा दिला की, जर स्नोडेनला आश्रय दिला तर रशियाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी स्नोडेनला पळून जाण्यास मदत केली हे संतापजनक आहे.
विकिलीक्सचा प्रमुख असलेला ज्युलियन असांज सध्या इक्वेडोरमध्ये लंडनच्या दूतावासात आश्रयाला आहे. स्नोडेनही तेथे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्नोडेनला या प्रकरणातून सोडवण्यासाठी विकिलीक्स प्रयत्न करण्याची शक्यता आहे. विकिलीक्सने आपली कायद्यातील तज्ञता आपल्यासाठी वापरावी अशी विनंती स्नोडेन याने केल्याचे समजते.
स्नोडेन याने आश्रयाबाबत केलेल्या विनंतीवर विचार सुरू आहे, असे इक्वेडोरचे परराष्ट्र मंत्री रिकाडरे पॅटिनो यांनी सांगितले. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा व जगातील नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा आहे, आम्ही तत्त्वाने वागत आलो आहोत. काही देशांची सरकारे ही स्वत:च्या हिताप्रमाणे वर्तणूक करीत आली आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान स्नोडेन हा रविवारी रशियात दाखल झाला आता तो क्यूबामार्गे इक्वेडोरला जाईल किंवा व्हेनेझुएला हा दुसरा पर्याय आहे.