भारत-पाकिस्तान यांच्यातील कठीण प्रश्नावर संवादाच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचे अमेरिकेने स्वागत केले आहे. दोन्ही देशांचे नेते व्यापक प्रमाणात सामंजस्य वाढवण्याचा खरोखर प्रयत्न करीत आहेत, असे अमेरिकेने सांगितले.
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले की, भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय प्रश्न सोडवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही देशात सामंजस्य निर्माण होत आहे ही चांगली बाब आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या मंत्र्यांना भारतविरोधी वक्तव्ये टाळण्याचे जे आवाहन केले आहे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, संवादाच्या प्रक्रियेत असा समतोल साधणे आवश्यक असते; पण शरीफ यांनी हे विधान नेमके कुठल्या संदर्भात केले आहे हे समजू शकलेले नाही त्यामुळे सविस्तर बोलता येणार नाही. गेली दहा वर्षी अतिरेक्यांना आश्रय देऊ नका असे पाकिस्तानला वेळोवेळी सांगत आलो आहोत, दहशतवादाबाबत नेहमी चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान व पाकिस्तान या देशांमध्ये अजूनही दहशतवादी संघटना मूळ धरून आहेत हे आम्हाला माहिती आहे. अनेक पाकिस्तानी नागरिक व सैनिकही दहशतवादाला बळी पडले आहेत, आम्ही इतर प्रश्नांवर पाकिस्तानच्या सारखे मागे लागत नाही पण दहशतवादाचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पाकिस्तान असो किंवा इतर देश, दहशतवाद हेच खरे आव्हान आहे.