पाकिस्तानने तालिबान्यांना केलेली मदत आणि अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेली भूमिका आता महागात पडण्याची चिन्हं दिसत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर विचार केला जाणार असल्याचं म्हटलं आहे. केवळ आपल्याच नाही तर भारताकडून अफगाणिस्तानसंदर्भात केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणणारी पाकिस्तानची भूमिका असेल तर ‘बघून घेऊ’ अशी भूमिका अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटींनी व्यक्त केलीय. मागील काही काळापासून पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील हस्तक्षेप वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने थेट पाकिस्तानचा उल्लेख करत जशास तसे उत्तर मिळेल असा सूचक इशारा पाकिस्तानला आणि पर्यायाने सत्ताधारी इम्रान खान सरकारला दिलाय.

नक्की वाचा >> “चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजणं ही…”; ९/११ हल्ल्याच्या २० व्या स्मृतीदिनी अमेरिकेला चीनचा इशारा

मागील २० वर्षांमध्ये तसेच त्यापूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनुसार त्यांनी अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल सातत्याने दावे केल्याचं दिसून आलं. त्यांनी तालिबान्यांना आश्रय दिला ज्यामध्ये हक्कांनी समुहातील तालिबान्यांचाही समावेश होता, असं अमेरिकन स्टेट सेक्रेट्री अँथनी ब्लिंकेन म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> लादेनचा साथीदार ९/११ च्या अल-कायदाच्या व्हिडीओत झळकला; अमेरिकेलाही बसला धक्का, कारण…

पाकिस्तानने अशी भूमिका घेण्यामागे त्यांचे काही विशिष्ट हेतू असतील आणि त्यापैकी काही अफगाणिस्तानसंदर्भातील आमच्या तसेच भारत अफगाणिस्तानमध्ये बजावत असणामऱ्या भूमिकेविरोधात जाणारे असतील तर आम्ही त्याकडे नक्कीच कटाक्षाने लक्ष देणार आहोत असंही अमेरिकने थेट शब्दात सांगितलं आहे.

इतक्यावरच न थांबता अमेरिकेने थेट पाकिस्तानला अफगाणिस्तानसंदर्भातील भूमिकेची किंमत चुकवावी लागणार असल्याचे संकेत दिलेत. “पुढील काही आठवड्यांमध्ये अमेरिका पाकिस्तानसोबत असणाऱ्या संबंधांबद्दल विचार विनिमय करणार आहे,” असं ब्लिंकेन म्हणाल्याचं रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या भविष्यासंदर्भात वॉशिंग्टन काय भूमिका घेणार आहे हे येत्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल असं ब्लिंकेन यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चीन आणि तालिबानचे संंबंध…”

पाकिस्तानची लुडबूड वाढली

पंजशीरमध्ये केलेले ड्रोन हल्ले, सत्ता स्थापना यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून मागील काही आठवड्यांमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये बरीच लुडबूड केल्याचं दिसून आलं आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी काही आठवड्यांपूर्वी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचं काम झाल्याची माहितीही समोर आली होती. पाकिस्तानच्या मदतीनेच तालिबानने सध्या हंगामी नेतृत्व हसन अखुंदकडे दिल्याचं सांगितलं जात आहे. हक्कानीला सरकारची मोट बांधण्यासाठी फैज यांनी मदत केल्याचं सांगण्यात येते.

नक्की वाचा >> “…म्हणून अफगाणिस्तान सोडण्याशिवाय काही पर्याय नव्हता”; सैन्य माघार घेण्याचं कारण सांगताना बायडेन यांनी केला चीन, रशियाचा उल्लेख

आयएसआयने हक्कानी नेटवर्कला सुरक्षा पुरवल्याचं सांगितलं जातं. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही हक्कानी गटाला दहशतवादी गट म्हणून जाहीर केलं आहे.