”दिल्लीकरांना आता खोटी आश्वासने मिळणार नाहीत. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. आतापर्यंत दिल्लीकरांना खोट्या आश्वासनांना बळी पडावं लागलं. ते आता होणार नाही,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. ‘विविधतेत एकता’ असल्याची घोषणा देत त्यांनी भाषणाला सुरूवात केली. त्याला उपस्थित चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मोदी यांनी या सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली. शिवाय त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार टीकाही केली. ”कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो तर त्यात आडकाठी आणण्याचे काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झाले नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही,” असा टोलाही मोदी यांनी यावेळी लगावला. ”दिल्लीतील २००० व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे,” असेही मोदी म्हणाले.

”१२०० पेक्षा अधिक वसाहतींचे नकाशे आता ऑनलाइन करण्यात आले आहेत. ४० लाख लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही दिल्ली मेट्रोचा अभूतपूर्व असा विकास केला,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, ”दिल्लीच्या मेट्रोच्या मार्गात ७० किमीची भर पडणार आहे. दरवर्षी याचा २५ किलोमीटर वेगाने विस्तार होत आहे.”