News Flash

पाकिस्तानचा कांगावा

रवेळी निवडणुका आल्यावरच भारतामध्ये दहशतवादी हल्ले कसे होतात, असा सवालही पाकिस्तानने केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारतच दहशतवाद पसरवत असल्याच्या उलटय़ा बोंबा

पाकिस्तान खरे तर दहशतवादाविरुद्धच निकराने लढत असून शांतता प्रस्थापित करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे असताना कोणताही सारासारविचार न करता भारताकडून पाकिस्तानवरच घातपात घडवित असल्याचे आरोप केले जात आहेत, पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी आमचा सुतराम संबंध नाही, उलट भारतच आमच्या देशात दहशतवाद पसरवत आहे, अशा उलटय़ा बोंबा पाकिस्तानने शुक्रवारी मारल्या आहेत.

पाकिस्तानच्या लष्कराने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, भारताकडूनच दहशतवाद पसरवला जात आहे आणि कुलभूषण जाधव हा याच भारतीय दहशतवादाचा चेहरा आहे. दरवेळी निवडणुका आल्यावरच भारतामध्ये दहशतवादी हल्ले कसे होतात, असा सवालही पाकिस्तानने केला आहे.

पुलवामा हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे, हल्ला करणारा तरुण भारताचाच नागरिक होता, हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी भारतीय होती, दारूगोळा आणि अन्य सर्व काही काश्मीरमधील होते, मग या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध कसा, असा सवालही पाकिस्तानने केला आहे. पुलवामा हल्ल्याचा पाकिस्तानला काहीच फायदा नाही, भारताकडून पाकिस्तानला एकटे पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले आहे.

नियंत्रण रेषेनंतर भारतीय सुरक्षारक्षकांची अनेक कडी आहेत, त्यांची नजर चुकवून एखादा पाकिस्तानी पुलवामापर्यंत जाऊच शकत नाही, त्या प्रदेशात स्थानिकांपेक्षा लष्कराचे जवान अधिक आहेत. त्यामुळे हल्ला कसा झाला ते  तेथील लष्कराला आणि गुप्तचर विभागालाच विचारले पाहिजे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

भारतीय समाज माध्यमांवर अशा प्रकारच्या हल्ल्यांची शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती, कोठे हल्ले होणार त्याचीही शक्यता वर्तविण्यात आली होती, असे सांगून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा अप्रत्यक्ष आरोप  पाकिस्तानने केला. आत्मघातकी हल्ला करणाऱ्या आदिलच्या अन्त्यविधीला हजारो स्थानिक हजर होते, असा खोटा दावाही पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.

पाकिस्तान आता बदलत आहे, एक नवा विचार पाकिस्तानात रुजत आहे, देशाने रक्तरंजित संघर्षांनंतर आजचा पाकिस्तान घडविला आहे, अफगाणिस्तानातील अल-कायदा दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही मदत केली आहे, पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही विचार केला, मग चौकशी केली आणि त्यानंतरच भारताला उत्तर दिले, असेही पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून निषेध

संयुक्त राष्ट्रे : पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी एकमुखी निषेध केला. विशेष म्हणजे नकाराधिकार वापरून सुरक्षा परिषदेत भारताच्या भूमिकेला पाठिंबा देणारे ठराव आजवर रोखून धरणाऱ्या चीननेदेखील  या ठरावाला समर्थन दिल्याने भारताची बाजू भक्कम झाली आहे. जैश-ए-महम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांवर तसेच या हल्ल्यासाठी आर्थिक, तांत्रिक आणि साधनसामग्रीची मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस सुरक्षा परिषदेने ठरावाद्वारे केली आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत.

भारताचे यजमानपद संकटात

नवी दिल्लीतील विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानच्या दोघा नेमबाजांचा व्हिसा नाकारल्याच्या घटनेने जागतिक क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या भारताच्या आकांक्षांना धक्का बसला आहे. कोणत्याही जागतिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबतची भारतासमवेतची चर्चा सध्या स्थगित करण्यात आली असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे.

सरकारशी चर्चेनंतरच विश्वचषक सामन्याचा निर्णय

भारत-पाकिस्तान यांच्यातील १६ जूनला होणाऱ्या विश्वचषक सामन्याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून याबाबत भूमिका निश्चित करू, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने शुक्रवारी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 2:08 am

Web Title: unlike the fact that india is spreading terrorism says pak
Next Stories
1 लोकसभा २०१९ निवडणूक जगाच्या इतिहासातली सर्वात महागडी ठरणार
2 आक्षेपार्ह ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संदेशांबाबत तक्रारीची सुविधा
3 सात पाकिस्तानी दहशतवाद्यांना जम्मूतून तिहारमध्ये हलवा
Just Now!
X