करोनाच्या संकटानंतर केंद्र सरकारनं लॉकडाऊन लागू केला. त्यानंतरच्या काळात देशातील नागरिकांसाठी मोबाईल आणि टीव्ही हेच मनोरंजनाची साधनं बनली. तब्बल तीन साडेतीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असून, ते कधी उघडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. केद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस केली असून, चित्रपटगृहांची द्वार उघडण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

३१ जुलै रोजी अनलॉक २.० संपणार आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून पुढे काय हा कुतूहल निर्माण करणारा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे. केंद्र सरकारनं सलग अडीच महिने कडक लॉकडाऊन लागू केल्यानंतर शिथिलता देण्यास सुरूवात केली होती. अनलॉकचे दोन टप्पे आता संपणार आहे. पहिल्या अनलॉकमध्ये फारशी शिथिलता केंद्रानं दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये बऱ्याच गोष्टी खुल्या झाल्या.

अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जीम (व्यायामशाळा) आणि चित्रपटगृह सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं चित्रपटगृहांच्या मालकांशी चर्चा करून केंद्रीय गृह मंत्रालयाला तसा प्रस्ताव दिला आहे. चित्रपटगृह चालकांनी ५० टक्के सीटच्या नियमानुसार तयारी दर्शवली आहे. मात्र, सुरूवातीला २५ टक्के सीटवरच प्रवेश दिला जावा आणि सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचं पालन व्हावं, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

जीम आणि चित्रपटगृह सुरू होण्याची शक्यता असली, तरी शाळा आणि मेट्रो अजून काही काळ बंदच राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकार या गोष्टी सुरू करण्यास लांबणीवर टाकू शकते. दरम्यान, चित्रपटगृह आणि जीम सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, तरी महाराष्ट्रातील चित्रपटगृह उघडण्याची शक्यता कमी आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्येच करोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यानं राज्य सरकार हा निर्णय लांबणीवर टाकू शकते.