दिल्लीत १५ ऑक्टोंबरनंतर जलतरण तलाव, मनोरंजन पार्क आणि चित्रपटगृह सुरु होऊ शकतात. केंद्र सरकारने अनलॉक ५.० अंतर्गत या सर्व गोष्टींना परवानगी दिली आहे. दिल्लीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. दिल्लीत चित्रपटगृहांना सर्व आसनं भरण्याची परवानगी दिली जाणार नाही. पण ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरु होऊ शकतात.

केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा, कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस सुरु करण्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. दिल्ली सरकार इतक्यात शैक्षणिक संस्था सुरु करण्याचा निर्णय घेईल असे वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्यानंतरच दिल्ली सरकार शैक्षणिक संस्थांना परवानगी देऊ शकते.

केंद्राने सामाजिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रमांना २०० जणांच्या उपस्थितीसह परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजधानीतील अनेक ‘रामलीला’ समित्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत दिल्लीत बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या असून तिथे निर्बंधही कमी आहेत.