स्वदेशी बनावट; ध्वनीपेक्षा जास्त वेग

स्वदेशी बनावटीच्या मानवरहित स्क्रॅमजेट विमानाची चाचणी येथे यशस्वीरित्या घेण्यात आली असल्याचे बुधवारी संरक्षण सूत्रांनी सांगितले. या विमानाचा वेग अत्यधिस्वनी म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त आहे. अत्यधिस्वनी क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा महत्त्वाचा भाग म्हणून यातील तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने बंगालच्या उपसागरावरील डॉ. अब्दुल कलाम बेटांवरून सकाळी ११.२५ वाजता ही चाचणी केल्याचे सांगण्यात आले. हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमनस्ट्रेटर व्हेइकल (एचएसटीडीव्ही) या विशेष प्रकल्पांतर्गत हे विमान विकसित करण्यात आले असून ते ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाते.

एचएसटीडीव्ही हा संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा कार्यक्रम असून स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचा वापर या विमानात वीस सेकंदांकरिता करण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे भारत असे तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या रांगेत जाऊन बसणार आहे.

हे तंत्रज्ञान दुहेरी वापराचे असून त्याच्या मदतीने ध्वनीपेक्षा जास्त वेगाने जाणारे विमान व लांब पल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे  हे दोन्ही शक्य आहे. त्याचे नागरी उपयोगही बरेच आहेत. कमी खर्चात उपग्रह पाठवण्यासाठीही त्याचा वापर करता येणार आहे. या विमानात स्क्रॅमजेट इंजिन वापरलेले असते, त्यामुळे ते ६ मॅक इतक्या वेगाने जाते. या तंत्रज्ञानात अनेक आव्हाने आहेत कारण यात तपमान १८०० अंश सेल्सियसपर्यंत वाढत असते.  अनेक वैज्ञानिकांच्या उपस्थितीत चाचणी यशस्वी झाल्याचे संरक्षण सचिव संजय मित्रा यांनी सांगितले.

‘एचएसटीडीव्ही’ तंत्रज्ञानाची वैशिष्टय़े

हे विमान वीस सेकंदात ३२.५ कि.मी म्हणजे वीस मैल उंची गाठते. त्याचा वेग ६ मॅकपर्यंत असतो. १५ ते २० कि.मी उंचीवर विमानाची कामगिरी कशी होते याची आधी चाचणी करण्यात आली. ते काम गेली दोन वर्षे सुरू होते.  या प्रकल्पात हायपरसॉनिक विमानाला स्क्रॅमजेट इंजिन वापरलेले आहे, असे संरक्षण संशोधन व विकास (डीआरडीओ)च्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. यात एचएसटीडीव्ही क्रूझ वाहन हे घन अग्निबाण मोटारीवर ठेवण्यात येते, त्याच्या मदतीने हे वाहन विशिष्ट उंचीवर जाते. नंतर क्रूझ वाहन प्रक्षेपक वाहनापासून वेगळे होते व नंतर त्यातील स्क्रॅमजेट इंजिन प्रज्वलित केले जाते.