उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सेनगर याच्या विरोधात पक्षाने का कारवाई केली नाही, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात दिले पाहिजे, अशी मागणी मंगळवारी विरोधकांनी लोकसभेत केली.

आरोपी सेनगर गेले वर्षभर तुरुंगात असला तरी पीडितेच्या कुटुंबीयांना फोन करून धमक्या देत असल्याची तक्रार पीडित तरुणीच्या काकाने पोलिसांत केली असून त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगर यांच्या आदेशामुळेच पीडितेच्या कारला अपघात घडवून आणला गेल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या अपघातात कुटुंबातील दोन नातेवाईकांचा मृत्यू झाल्यानंतर सेनगरविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उन्नाव घटनेची संपूर्ण देशाला शरम वाटते. अल्पवयीन मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार हा नागरी समाजावरील काळा डाग आहे.. म्हणूनच केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. त्यावर, संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्टीकरण दिले. या प्रकरणावरून कोणी राजकारण करू नये. सीबीआय चौकशी केली जात असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकार निष्पक्षपणे चौकशी करत आहे, असा दावा जोशी यांनी केला. पीडिताच्या अपघातानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी अधिकृत मागणी उत्तर प्रदेश सरकारने केंद्राला मंगळवारी केली.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सेनगर सध्या तुरुंगात असून तिथूनच सेनगर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना धमक्या देणारे फोन करत असे, अशी तक्रार पीडिताच्या काकाने अपघाताच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांमध्ये केली.

रायबरेली येथे पीडिता बसलेल्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली होती. २०१७ मध्ये नोकरी मागायला गेलेल्या पीडितावर सेनगर याने त्याच्या घरात बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. अन्यायाविरोधात लढणाऱ्या तिच्या वडिलांना अटक करण्यात आली. त्यांना पोलीस कोठडीत जबर मारहाण करण्यात आली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

चौकशीसाठी ‘एसआयटी’

लखनऊ : उन्नाव अपघाताची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली.

काकाला पॅरोल मंजूर

उन्नाव बलात्कार पीडितेचे काका महेश सिंह यांना रविवारच्या अपघातात ठार झालेल्या त्यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला.

सेनगरला पूर्वीच निलंबित केल्याचा भाजपचा दावा

लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणात सध्या तुरुंगात असलेला भाजप आमदार कुलदीप सिंह सेनगर याला भाजपमधून हाकलण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली असताना सेनगर याला पूर्वीच पक्षाने निलंबित केले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितले. सेनेगर याला पक्षातून निलंबित केले असून त्यात बदल झालेला नाही असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

महिला आयोगाच्या सदस्या लखनऊमध्ये

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी मंगळवारी लखनऊमध्ये पीडिताच्या आईची भेट घेतली. आयोगाच्या सदस्या रुग्णालयात गेल्या होत्या, पण पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी भेटीची परवानगी  दिली नाही.

पंतप्रधान.. कृपा करा, राजकीय गैरवापर थांबवा- प्रियंका गांधी

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी उन्नाव प्रकरणात केंद्र तसेच, उत्तर प्रदेश सरकारविरोधातील शाब्दिक हल्लाबोल आणखी तीव्र केला आहे. पंतप्रधान मोदी यांना उद्देशूनही प्रियंका यांनी ट्वीट केले आहे. पंतप्रधान कृपा करा.. तुमचा पक्ष दोषी आणि त्याच्या भावाला राजकीय ताकद पुरवत आहे. ही मदत थांबवा, असे आवाहन प्रियंका यांनी केले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार व प्रशासनाला धारेवर धरले.