* ९० टक्के भाजलेल्या तरुणीची प्रकृती चिंताजनक * पाच जणांना अटक

उन्नाव (उत्तर प्रदेश) : हैदराबाद प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे क्रौर्याची परिसीमा गाठणारी आणखी एक घटना गुरुवारी घडली. बलात्कारपीडित तरुणी न्यायालयात जात असताना पाच जणांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ९० टक्के भाजलेली तरुणी मृत्यूशी झुंज देत असून, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बलात्कार झालेली पीडित तरुणी गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उन्नाव येथून रायबरेली  येथे जात होती. पाच जणांनी वाटेत गाठून तिला जाळले. त्यात ती ९० टक्के भाजली असून, तिला लखनौमधील श्यामा प्रसाद मुखर्जी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, तिला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशुतोष दुबे यांनी सांगितले. तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले.

पीडित तरुणीला जाळल्याप्रकरणी हरिशंकर द्विवेदी, रामकिशोर त्रिवेदी, उमेश वाजपेयी, शिवम त्रिवेदी आणि शुभम त्रिवेदी या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवम आणि शुभम त्रिवेदी या दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपहरण करून बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता. या प्रकरणात मार्च २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील एका आरोपीची २५ नोव्हेंबरला जामिनावर सुटका करण्यात आली होती, तर एक जण फरार होता. तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये या दोघांचाही समावेश आहे.

याआधी उन्नावमध्येच २०१७ मध्ये सामूहिक बलात्काराचे प्रकरण घडले होते. या प्रकरणात भाजपचा निलंबित आमदार कुलदीपसिंग सेनगर आरोपी असून, न्यायालय या प्रकरणाचा निकाल १५ डिसेंबर रोजी देणार आहे.

योगी आदित्यनाथ लक्ष्य

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, भाजप नेत्यांनी आता तरी अपप्रचार थांबवावा, असे प्रियंका यांनी म्हटले आहे. तर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी योगी सरकारने स्वीकारावी, असे ट्वीट अखिलेश यांनी केले. योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आणि प्रशासनाला दिले आहेत.

संसदेत पडसाद

उन्नाव प्रकरणाचे पडसाद गुरुवारी राज्यसभेत उमटले. विरोधी पक्षांनी, मुख्यत्वे काँग्रेसने या प्रकरणावरून सभागृहात गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. या प्रकरणाबाबत सदस्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी उपसभापतींना केली. मात्र, ती त्यांनी अमान्य केल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करून गोंधळ घातला.

आयोगाने अहवाल मागवला

राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांना दिले. या संपूर्ण प्रकरणासह पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग यांना दिले. तीन वर्षांत महिलांविरुद्ध घडलेल्या गुन्ह्य़ांचा आणि या प्रकरणांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या जामिनांबाबतचा तपशीलही देण्यात सांगण्यात आले आहे.